पुणे: वानवडीत एका वाळू पुरवठादार तरुणावर अज्ञातांनी गोळीबार

बांधकाम व्यावसायिकावर गोळी झाडून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच वानवडीत एका वाळू पुरवठादार तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, हल्लेखोर पसार झाले आहेत. गोळीबारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मयूर हांडे (वय 32, रा. वानवडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हे वाळू सप्लायर आहे. आज दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास मयूर दुचाकीवरून हांडेवाडी रोडने जात असताना श्रीराम चौकात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यात एक गोळी मयूर यांच्या गालाला चाटून गेल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी वानवडी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली आहे. 8 दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयाजवळ गोळी झाडून एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या केली होती. त्यात आज आणखी एक गोळीबार घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.