पहिले ईव्हीएम मशिन हॅक आता भाजपची मंडळी थेट मुख्यमंत्र्यांनाच हॅक करायला लागली


बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कम्युनिस्ट पक्षानेही या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कन्हैय्या कुमार हा मैदानात उतरला आहे. बेगूसरायपासून कन्हैय्या कुमारने प्रचाराला सुरुवात केली आहे. बखरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार सुर्यकांत पासवान आणि तेघरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राम रतन सिंह यांच्या प्रचारासाठी कन्हैय्या याने सभा घेतल्या. या सभांमध्ये त्याने केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपवर सडकून टीका केली.
कन्हैय्या याने या सभेत बोलताना म्हटले की पहिले ईव्हीएम मशिन हॅक होत होती, मात्र आता भाजपची मंडळी थेट मुख्यमंत्र्यांनाच हॅक करायला लागली आहेत. मध्य प्रदेशातील काही महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींबाबत बोलताना कन्हैय्या याने म्हटले की ‘जोपर्यंत ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत ते वाईट होते. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर जणू त्यांनी गंगेत स्नान केल्याप्रमाणे ते शुद्ध झाले आहेत. कन्हैय्या याने पुढे बोलताना म्हटले की मी मागे एकदा म्हणालो होतो की भाजपवाले मला देशद्रोही-देशद्रोही म्हणतील. मी त्यांना आता म्हणेन खबरदार, जास्त बोललात तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन.’ कन्हैय्याने म्हटले की ही मंडळी ज्यांना शिव्या देतात त्यांना पाच मिनिटांमध्येच आपला नातेवाईक बनवून टाकतात.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैय्या कुमार हा बिहारमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा स्टार प्रचारक आहे. कन्हैय्या हा मूळचा बेगूसरायचाच राहणारा आहे. तो कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचा सदस्यही आहे. गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाने कन्हैय्या कुमारला उमेदवारी दिली होती, मात्र भाजपच्या गिरीराज सिंह यांनी त्याचा पराभव केला होता. कन्हैय्या याने आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे, सध्या तो आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतोय.
गेल्या लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने कन्हैय्या कुमारला पाठिंबा दिला नव्हता. तेजस्वी यादव यांनी त्यावेळेला कन्हैय्या कुमारला पाठिंबा न देण्याचे कारणही सांगितले होते. यादव यांनी म्हटले होते की कम्युनिस्ट पक्ष हा एका जातीचा पक्ष आहे. यंदाच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष हा राष्ट्रीय जनता दल सदस्य असलेल्या महाआघाडीत सामील झाला आहे. यावेळी तेजस्वी यादव आणि कन्हैय्या एका मंचावर येणार का याबाबत बिहारमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.