लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्या- नाना पटोले

मुंबई : लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. शासनाने घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून आज नाना पटोले यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत तसंच उर्जा विभागाचे आणि वित्त विभागाचे अधिकारी, वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना उद्रेकाच्या काळात शासनाला लॉकडाऊन करावं लागलं. राज्य शासनाने लोकांना घरात बसून काम करायला सांगितलं. त्यामुळे लोक घरात थांबली. याच काळात शासनाकडून वाढीव वीज बिल देण्यात आली. शासनाने या घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले आहेत.

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे लहान उद्योग धंदे बंद पडले आहेत. हातावर पोट भरणारे आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. त्यातच महावितरणाच्या वाढीव वीजेच्या बिलामुळे जनता चिंताग्रस्त झाली आहे. महावितरण कार्यालयात अनेक ग्राहक त्यांच्या वाढीव वीज बिलाबद्दल तक्रार घेऊन गेल्यावर तेथील आधिकारी त्यांची साधी दखल सुध्दा घेत नाहीत.

भाजपसह मनसेने याविरोधात आवाज उठवत राज्य सरकारकडे वारंवार निवेदने दिली. त्यावर सरकारने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश खुद्द विधानसभा अध्यक्षांनीच सरकारला दिले आहेत.

Latest News