रिकामेशेड कंपनीला भाड्याने देऊन लाखो रुपयांची फसवणूक

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे गाव हद्दीत रद्द कुलमुखत्यारपत्र खरे असल्याचे भासवून रिकामे शेड एका कंपनीला भाडे करारावर देऊन लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी उद्योजक विजय पांचाळ उर्फ शर्मा व रजत वर्मा या दौघांवर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आहे. मात्र, अद्यापही या आरोपींना अटक झालेली नाही.
महाळुंगे पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी राजकुमार सिंग (वय 47) व त्यांचे भागीदार सुनील नंदलाल मरिय आणि रजत वेदप्रकाश वर्मा यांची निघोज येथील गट 44 क्षेत्रात तीन एकर जमीन आहे. या जमिनीवर गोडावून उभारणे व भाड्याने देण्याकरिता तसंच इतर कामाकरिता यातील एक भागीदार रजत वेदप्रकाश वर्मा व दुसरा आरोपी विजयपाल किशोरीलाल शर्मा ऊर्फ पांचाळ यांना 2014 साली कुलमुखत्यार करून दिले होते. कुलमुखत्यार पत्राप्रमाणे ग्रीव्हज कॉटन लिमिटेड या कंपनीच्या मागणीप्रमाणे शेड पूर्ण झाल्यावर सदर कुलमुखत्यार तीन महिन्यानंतर रद्द करण्यात आले होते.
संबंधित कंपनीने शेड ऑगस्ट 2019 मध्ये रिकामे केल्यानंतर विजयपाल शर्मा उर्फ पांचाळ व फिर्यादीचा भागीदार रजत वर्मा या दोघांनी संगणमत करून जुने रद्द केलेले कुलमुखत्यार पत्र खरे असल्याचे भासवून निर्मिती प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस 14 जुलै 2020 रोजी परस्पर भाडेतत्वावर देऊन तसा दस्त दुय्यम निबंधक कार्यालय खेडला नोंदणीही केला. या व्यवहारात मिळालेले 56 लाख 53 हजार 800 रुपयांची फसवणूक करुन रक्कम परस्पर लंपास केली आहे.
या प्रकरणी विजयपाल शर्मा उर्फ पांचाळ व रजत वर्मा या दोघांवर भादंवि कलम 419,,420,423,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेले कुलमुखत्यार खरे असल्याचे भासवून दोघांनी लाखो रुपये बळकावून एका उद्योजकाची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली.