हा देश राज्यघटनेनुसारच चालणार- संजय राऊत

मुंबई: शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले आहेत. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. हिंदुत्व हे शिवसेनेचा श्वास असून ते आमच्या ह्रदयात आहे. देश आणि राज्य हे घटनेनुसारच चालतं असं उत्तर खासदार राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी देशात हिंदुत्वाची मशाल जिवंत ठेवली. त्यामुळे शिवसेनेला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आणि कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवूसुद्धा नये. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री ही पदं संवैधानिक आहेत. धर्मनिरपेक्षता हे तत्व घटनेचं तत्व असल्याने त्यानुसारच सगळ्यांनी कारभार केला पाहिजे. राज्य हे राज्यघटनेच्या तत्वानुसारच चाललं पाहिजे असंही ते म्हणाले
भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
आसाममधल्या भाजप सरकारने तिथले सगळे मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून खरे हिंदुत्व दाखवून द्या अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर म्हणाले, मदरश्यांमध्ये कोणतंही आधुनिक शिक्षण न देता एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात थेट मदत करावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
मदरश्यांमध्ये धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली कट्टरतावादाचं शिक्षण दिलं जातं असा आरोप भाजप सातत्याने करत आला आहे. राज्यात शिवसेनेने वेगळी वाट निवडल्याने दुखावला गेलेला भाजप सातत्याने आता शिवसेना हिंदुत्वाबाबात प्रश्न विचारत आहे. त्यातच राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातली मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर तुम्ही हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्ष झाला आहात का? असा खोचक सवालही केला होता. त्यावरून राज्यात वादळ निर्माण झालं होतं.