कोरोनाची लस निरोगी आणि तरूण असलेल्या लोकांना 2022 पर्यंत मिळणार नाही- WHO


कोरोना व्हायरसच्या प्रसाराने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातलं आहे. अशा स्थितीत लस कधी मिळणार याचीच सगळ्यांना प्रतिक्षा आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटनसह अनेक देशांमधील लसीच्या चाचण्या या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशातच कोरोना लसीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार निरोगी आणि तरूण असलेल्या लोकांना २०२२ पर्यंत कोरोनाची लस मिळणार नाही.
एका सोशल मीडिया इवेंटदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेतील सदस्या सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, ”निरोगी आणि तरूण वयोगटातील लोकांना कोरोना व्हायरसची लस २०२२ पर्यंत मिळू शकणार नाही. कारण कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून वयोवृद्ध आणि सगळ्यात जास्त धोका असलेल्या लोकांना सगळ्यात आधी लस दिली जाणार आहे.” बहुतेक लोक सहमत आहेत की आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंट-लाइन कामगारांपासून लसीकरणाची सुरूवात व्हायला हवी. याशिवाय लसीकरण वृद्धांपासून का सुरू करायला हवं याची कारणंही दिली जाणं आवश्यक आहेत. असं सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.
कोरोनाच्या लसीसाठी जागतिक स्तरावर खूप दबाव आहे. क्लिनिकल चाचणीसाठी डझनभर लसी या पुढे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ लस तयार करण्यासठी प्रयत्नरत असून लसीसाठी कोणताही शॉर्टकटचा वापर होत नाहीये ना, याची काळजी घेतली जात आहे. जॉन्सन अँड जॉन्सन आणि एस्ट्रॉजेनेका या कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात आपली चाचणी थांबवली होती. अंतिम यशस्वी लस उपलब्ध झाल्यानंतर अब्जावधी डोसचे उत्पादन करणे हे एक मोठे आव्हान असेल.