लोकशाहीचा चौथा खांब

गेल्या चार वर्षात राममंदिर,गोमास,गोरक्षा,घरवापसी,कन्हैय्याकुमार,शाहरुख खान,सहिष्णुता,असहिष्णुता ,जेएनयू ,भारतमाता कि जय,वंदे मातरम,काश्मीर ,सर्जिकल स्ट्राईक,ट्रिपल तलाक,नोटबंदी,अजान …सामान्य माणसाच्या मुख्य प्रश्नांना फाट्यावर मारून मीडियाने गेली तीन वर्ष लोकांना या मुद्द्यात गुंतवून ठेवलं आणि त्यात यशस्वी झाली.
गेल्या चार वर्षात तुम्ही कधीही टीव्ही चॅनेल वर सरकारी शिक्षणाच्या ढासळत्या दर्जावर कुठल्या पत्रकाराला आवाज उठवताना पाहिलंय ?आजही ग्रामीण भागात बालविवाहाची समस्या आहे हा मुद्दा उचलताना पाहिलंय ?रस्त्र्यावर भीक मागणाऱ्या मुलांवर कधी कॅमेऱ्याचा फोकस गेलेला पाहिलंय ?झोपडपट्टी,गटाराच्या बाजूला उघड्यावर राहणाऱ्या लोकांसाठी त्या लोकांच्या समस्यांवर कुठल्या चॅनेल ला कार्यक्रम घेताना पाहिलंय ?आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना सहानभूती देताना पाहिलंय ?बेरोजगारीचे फटाके खाणाऱ्या युवकांचे प्रश्न मांडताना पाहिलंय?कुपोषण,आजार ,अशात लहान मुलांचे जाणारे बळी या मुलांसाठी रडताना कुठल्या चॅनेल ला पाहिलंय ?ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी केले गेली त्याच्यावर बोलताना पाहिलंय?ग्रामीण भागातल्या तरुणांचं वेगाने होणार स्थलांतर या वर कुठल्या चॅनेलला बोलताना पाहिलंय?
गेल्या चार वर्षात मीडिया  मोठ्या हुशारीने लोकांना व्यर्थ मुद्द्यावर चर्चा करत गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालाय.या काळात बरेच घोटाळे झाले .आणि आम्हला कानोकानी त्याची खबर लागली नाही.चाटूगिरी आणि आम्ही सगळ्यात पुढे या असल्या जमान्यात पत्रकारिता किती बदलली आहे.अजेंडा जनतेसाठी गायब झाला आहे.कारण जनता स्वतःच एक अजेंडा बनली आहे.सत्ताधीशांनी फेकलेल्या तुकड्यांना चाटणार्या पत्रकारांनी सरड्यासारखे रंग बदललेले आहेत.कॅमेऱ्याच्या केंद्रस्थानी आज गरीब मरणारा शेतकरी नाही.अन्न ,वस्त्र,निवारा हा प्रश्न नाही ..केंद्रस्थानी फक्त हंगामा आहे …फक्त हंगामा.
पत्रकारांच्या डोळ्यात काही ध्येय नाही कारण त्यांचे डोळे पाखंडाच्या मोतीबिंदूने आंधळे झालेले आहेत.नशेमध्ये हरवलेले बालपण,वेश्याव्यवसायात हरवलेल्या मुली,धक्के खाणारा तरुण,आत्महत्या करणारा शेतकरी या सगळ्या गोष्टी चॅनेलला टीआरपी देत नाहीत.चाटू चॅनेल ने बातम्यांचा अर्थच बदलून टाकलाय.बातम्या ज्या तुम्हाला चुकीच्या रस्त्याला जाण्यापासून सावध करतात.बातम्या तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला तयार करतात.पण बातम्या जेव्हा बाजारू होतात किंवा सत्तेची रखेल बनतात तेव्हा अँकर दलाल होतात,पत्रकार भडवे होतात.तेव्हा बातमी हि बातमी राहत नाही ती बाहुली होते,अशी बाहुली जिची चावी सत्ताधारी आणि व्यापाऱ्यांच्या हाती विकली जाते.तेव्हा पत्रकारितेच्या नावावर पाखंड्यांचा नंगानाच सुरु होतो.ब्रेकिंग न्युज सगळं काही तोडून टाकतात.प्राईम टाइम मध्ये काहीच प्राईम राहत नाही.अँकर बातम्यांच्या नावावर भंपक लोकांची भलामण करायला लागतात.रिपोर्टर नीच लोकांचे सपोर्टर होऊन जातात.टीव्ही कॅन्सर पसरवायला लागतो.
आणि मग भुकेचा प्रश्न मन कि बात ने सोडवला जातो गरिबीला ज्योतिषशास्त्रांने दूर केलं जात आक्रोशाचा सौदा होतोराष्ट्रवाद विकला जाऊ लागतोमाणुसकी सैतानी मध्ये बदलू लागतेटीआरपीच्या हिशोबाने द्वेष ठरवला जातोदाढीमध्ये आतंक,मिशीमध्ये जात शोधली जाते कपड्यात धर्म,खाण्यात अधर्म शोधला जातोमंदिराच्या घंटेच्या आवाजात झोपडीतून येणार आक्रोश दाबला जातोअजानच्या गोंगाटात गरिबांचा आक्रोश दाबला जातो शनीच्या माहात्म्यात गरिबी हटवण्यासाठी काही उपाय नाही.
न्यायाच्या नावावर अन्यायाची मार्केटिंग करण्याचा हा धंदा तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत हा लोकशाहीचा चौथा खांब उद्योगपतींच्या पैशावर पोसला जाईल.पत्रकारांचा हा समूह जमिनीला सोडून आकाशात उडू लागलाय.स्वतःच्या कर्तव्यापासून लांब गेलाय.कारण लोकशाहीचा हा चौथा खांब पूर्णपणे मोडून गेलाय.
टीप : वर लिहिलेलं सगळं चाटू पत्रकारांना लागू होत ज्यांनी भक्तीची परिसीमा गाठलीय.माझ्या पत्रकार मित्रांना नाही.