महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांमधील कटूपणा संपला.. ‘तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला’!

IMG_20190115_204842

पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात एकमेकांचे कडवे विरोधक असलेले महापौर राहुल जाधव आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यातील कटूपणा आज संपला आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हे दोघेही एकत्र आले. हे नुसते एकत्र आले नाही तर दोघांनीही एकमेकांना तिळगुळ भरवत, तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला.. अशा शुभेच्छाही दिल्या.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे पिंपरी चिंचवड शहराचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच रंगले आहे. बार्सिलोना दौऱ्यातील आयुक्त, सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकत्र सेल्फीने राजकीय वातावरण पेटले होते. त्यात भर की काय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या फोटोनेही बरीच खळबळ उडवून टाकली. आता संक्रांतीचे औचित्य साधून महापौर राहुल जाधव आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी एकमेकांना दिलेल्या ‘तिळगुळरूपी’ ‘गोड’ शुभेच्छा दिल्यात. या दोन्ही नेत्यांच्या या फोटोमुळे अनेकांच्या भुवयां मात्र उंचावल्या आहेत. शहराच्या राजकारणात नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता या दोघांमधील कटूपणा कायमचा मिटावा अशीच अपेक्षा आज संक्रांतीनिमित्त आपण तरी व्यक्त करूयात..