अर्णब गोस्वामी: कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी घरातून अटक केली आहे. या कारवाईवरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख म्हणाले कि, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील. ही केस बंद झाली होती. परंतु, अन्वय नाईक यांच्या पत्नीने न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी ८ सप्टेंबर रोजी विधानसभेत दिली होती.

काय आहे प्रकरण?

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असून पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. यानुसार, अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तर, पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे.

Latest News