पुण्यात एका राजकीय चर्चेने भाजपाची झोप उडाली…


पुणे – महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठं यश मिळवलं होतं. मागील निवडणुकीत तब्बल ९८ नगरसेवक निवडून आणत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेतून अनेक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता यातील काही नगरसेवक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या चर्चांना अफवा असल्याचं सांगत खंडन केले आहे. भाजपाचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी मुद्दाम अशाप्रकारे बातम्या पसरवत आहेत, ज्यात काही निष्पन्न होणार नसल्याचं बापट आणि मुळीक यांनी म्हटलं आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता. याबाबत टीव्ही ९ने बातमी दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले, यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपणचं नंबर वन असल्याचा दावा करत आहे. राज्यात ५ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतीवर भाजपानं सत्ता आणल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. परंतु महाविकास आघाडीला ग्रामीण जनतेने कौल दिला आहे असं सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत. ग्रामपंचायत निकालांचे दावे-प्रतिदावे केले जात असताना यातच पुण्यात एका राजकीय चर्चेने भाजपाची झोप उडाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपामध्ये नगरसेवक नाराज असल्याची चर्चा फक्त पत्रकारांमध्येच आहे. कोणीतरी पुड्या सोडत चुकीच्या बातम्या पसरवत आहे. भाजपा सोडून कोणीही जाणार नाही, तर इतर पक्षातून भाजपामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, मात्र भाजपाने ही सत्ता उलथवून लावत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला होता. पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अजित पवार अनेकदा बोलून दाखवतात. महापालिकेत भाजपा सत्तेच्या काळात अनेक नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करत असून शहरात विकासाची घौडदौड सुरू आहे.