माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करा ठाकरे सरकारकडे युवराज दाखले यांची मागणी

पिंपरी (दि. 22 जानेवारी 2021) माजी मंत्री गिरीष महाजन आणि इतर आरोपींवर कोथरुड, पुणे पोलीस ठाण्यात काही दिवसांपुर्वी खंडणी व इतर कलमांर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांवर कडक कारवाई करुन त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी म्हणजेच ‘मोका’ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी भारतीय लहुजी पॅंथर या संस्थेचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर केली आहे. दाखले यांनी केलेल्या तक्रार अर्जाची पोलीस प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यांना याबाबत गुरुवारी (दि. 21 जानेवारी) पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कोथरुड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, कोथरुड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर नंबर 03/2021 भा. दं. वि. कलम 120 (ब), 331, 384, 379, 447, 448, 449, 454, 465, 467, 468, 471, 474, 504, 506 (2), 511, 109, 34 प्रमाणे गिरीष महाजन व इतर आरोपींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांचेवर तात्काळ कारवाई करुन मोका अतंर्गत गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार युवराज भगवान दाखले यांनी केली आहे. तरी सदरचे गुन्ह्यामध्ये चौकशी व सखोल तपास चालू असून यातील आरोपींविरुध्दचे उपलब्ध पुरावेअंती योग्य ती कायदेशीर कारवाई चालू असून भविष्यात आणखीनचे पुरावे मिळाल्यास योग्य ती पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्याच प्रमाणे याबाबत दाखले यांनी दिलेला तक्रारी अर्ज दप्तरी दाखल करण्यात येत आहे. असे पोलीस प्रशासनाकडून युवराज दाखले यांना पत्र देण्यात आले आहे. याबाबत दाखले यांनी माजी मंत्री गिरीष महाजन व इतरांविषयी दिलेला तक्रार अर्ज आणि दाखले यांना पोलीसांनी दिलेले उत्तर प्रसिध्दीस दिले आहे.—

Latest News