ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यास तो पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल.

मुंबई | सामनातील रोखठोक या सदरामध्ये संजय राऊत यांनी व्यक्त होत असताना म्हटलं की, ‘ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये विजय झाल्यास तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल.’ त्याच बरोबर त्यांनी अनेक भाकीतं देखील केली आहेत.“पश्चिम बंगाल निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ सुरू केले जाईल, असे सांगणारे बरेच लोक मला भेटतात. तेव्हा मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. कारण, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालांवर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे, असं सांगणारे नेमके कोणत्या नंदनवनात वावरत आहेत?” असा प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशभरातील लोकांचं लक्ष लागलेलं आहे. आज या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान याच विषयावर भाष्य करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.यावरच बोलताना त्यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्रात कदाचित आमदारांची फोडाफोड होऊ शकते. तसेच कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलं असं सांगून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटही लावली जाऊ शकते. पण देशात औषध आणि ऑक्सिजनची कमतरता असताना लोकांचे मोठ्या प्रमाणात जीव जात आहेत. अशा स्थितीत असे राजकीय डावपेच सुचतातच कसे?