पतीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पत्नीसह प्रियकरालाही अटक…


पुणे :प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या अभियंत्याचा दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीकडून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गाढ झोपेत असलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पत्नीसह प्रियकरालाही अटक करण्यात आली.पती मनोहर प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकराबरोबर संगनमत केले. २३ मे रोजी गौरवने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. त्यानंतर पतीला दुधातून तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. गाढ झोपेत असलेल्या मनोहरचा दोघांनी गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
मनोहर नामदेव हांडे (वय २७, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्विनी मनोहर हांडे (वय १९, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता), प्रियकर गौरव संतोष सुतार (वय १९, रा. उत्तमनगर, फुरसुंगी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. २४ मे रोजी मनोहर हांडेचा अकस्मात मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.
या दरम्यान हांडेचा अश्विनीचे आरोपी गौरव याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती.शवविच्छेदन अहवालात मनोहरचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन तसेच त्याचा गळा दाबण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांच्या चौकशीत अश्विनीचे गौरवबरोबर विवाहबाह्य़ संबंध असल्याचे उघड झाले होते
.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मनोहर करोनाबाधित असल्याने तो अलगीकरणात राहून घरीच उपचार घेत होता. त्याचा खून केल्यानंतर आरोपी गौरव पसार झाला. दुसऱ्या दिवशी मनोहर झोपेतून उठला नाही. अश्विनीने पतीचा करोनाने मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक केतन निंबाळकर, नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला.