पुणे महापालिकेने ‘महावितरण’ सोडून वीज खरेदीसाठी इतर पर्यायांचा विचार सुरू …

mahavitaran

पुणे पुणे जिल्ह्यात विजेचा सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या पुणे महापालिकेने वीज खरेदीसाठी ‘ सोडून इतर पर्यायांचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) प्रस्ताव मागविण्यात आले असून, सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर येत्या आठवड्यात सादर करण्याची शक्यता आहे. महापालिकेला दर वर्षी वीज बिलांपोटी सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च करावे लागतात.

वीजखरेदीत प्रति युनिट एक रुपयाची बचत झाली, तरी वर्षाकाठी १५ कोटी रुपयांची बचत होणार आहे. महापालिकेच्या बचतीतून संबंधित सल्लागाराला पैसे देण्यात येणार असल्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

दर महिन्याला २३ मेगावॅट इतकी विजेची मागणी असून, एक कोटी २८ लाख ५५ हजार ४५० इतके युनिट खर्च होतात. विजेपोटी येणाऱ्या खर्चात बचत करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी खरेदीच्या दराबाबतही विचार करण्यात येत आहे.

महापालिका मोठी वीजग्राहक असून, वीज उत्पादक कंपन्यांकडून महापालिकेला विजेच्या दरात सवलत मिळू शकते. त्यासाठी ‘ओपन अॅक्सेस’द्वारे वीज खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

. त्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वीज खरेदीसाठी सल्लागाराची नेमणूक झाल्यानंतर त्याच्याकडून महापालिकेस चांगला दर देणाऱ्या वीज पुरवठादार, ठेकेदाराशी वीज खरेदी करणे,

दर महिन्याला होणारी खरेदी ही फायद्यात होते ना, याची खात्री देणे, ‘महावितरण’ आणि इतर खासगी कंपन्यांशी समन्वय साधून, या संबंधीची कामे मार्गी लावणे, अशी जबाबदारी राहणार आहे.

महापालिकेची विजेची गरज

– जलशुद्धिकरण आणि उपसा केंद्रासाठी २३ मेगावॅट विजेची मागणी.

– दर महिन्याला एक कोटी २८ लाख ५५ हजार ४५० इतके युनिट वीज वापरली जाते.

– एक रुपयांनी दर कमी झाला, तरी १५ कोटी ४२ लाख रुपयांची बचत शक्य.