भाजपाच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी – बुधवारी (दि. 18) स्थायी समितीवर ‘एसीबी’ची धाड पडल्याने तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षांना अटक करण्यात आल्याने भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे. या अडचणीतून पक्ष अद्याप सावरलेला नाही. तोपर्यंत या पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राजू लोखंडे हे पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून महापालिकेवर निवडून आले होते. तर राष्ट्रवादीने त्यांना शिक्षण मंडळावरही काम करण्याची संधी दिली होती. मात्र 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. लाचखोरीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे. त्यातच आता या पक्षाला गळती लागण्यासही सुरुवात झाली. भाजपाच्या नगरसेविका तथा महिला बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीपूर्वीच या पक्षात पडझड सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.

2017 च्या निवडणुकीत राजू लोखंडे यांच्या पत्नी चंदा लोखंडे या भाजपाकडून महापालिकेवर निवडून आल्या आहेत. सध्या त्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम पहात आहेत. राजू लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड विभागाचे माजी अध्यक्ष विजय जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे आदी उपस्थित होते.

अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव परिसरातच लोखंडे यांच्या रुपातून पक्षाला खिंडार पडल्याचे मानले जात आहे. लोखंडे यांच्या पाठोपाठ अनेकजण राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लाचखोरी प्रकरणामुळे भाजपातून बाहेर पडण्यास उत्सूक असलेल्या अनेकांना आयती संधी मिळाली आहे. गयारामांना रोखण्यात भाजपा यशस्वी ठरते की या पक्षाची पडझड कायम राहते, हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे.

आणखी 25 ते 30 जणांचा प्रवेश – जगताप
गेल्या साडेचार वर्षांतील भाजपाच्या भ्रष्ट कारभाराला त्यांच्याच पक्षातील अनेक नगरसेवक वैतागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांची संख्या आता 25 ते 30 वर पोहोचली असून, हे सर्वजण लवकरच शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिली. ते म्हणाले 25 ते 30 नगरसेवकांचा भव्य प्रवेश लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरामध्ये आयोजित एका कार्यक्रमात होणार आहे. त्यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 10 ते 15 विद्यमान नगरसेवक आहेत.

Latest News