ज्ञानज्योती शैक्षणिक उपक्रमांतर्गत महिलांना मिळणार दहावी-बारावीपर्यंत शिक्षण, अर्ज करण्याचे सारिका कृष्णा भंडलकर यांचे महिलांना आवाहन


अर्ज करण्याचे सारिका कृष्णा भंडलकर यांचे महिलांना आवाहनज्ञानज्योती शैक्षणिक उपक्रमांतर्गत महिलांना मिळणार दहावी-बारावीपर्यंत शिक्षणअर्ज करण्याचे सारिका कृष्णा भंडलकर यांचे महिलांना आवाहन
पिंपरी, प्रतिनिधी :ज्ञानज्योती शैक्षणिक उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांना किमान दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण मिळावे, यासाठी अत्यल्प दरात फॉर्म भरून घेऊन त्यांना बहि:स्थ पद्धतीने दहावी किंवा बारावीला प्रवेश देण्यात येणार आहेत, यासाठी गरजू महिलांनी संपर्क साधण्याचे आवाहन डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर यांनी केले आहे.
सारिका भंडलकर यांनी सांगितले, की महिलांना समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील एक मुख्य समस्या म्हणजे अपूर्ण शिक्षण, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक कारणे किंवा इतर अनेक घटकांमुळे महिलांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अर्धवट शिक्षणामुळे त्या आपल्या मुलांचा योग्य प्रकारे अभ्यास घेऊ शकत नाहीत किंवा शासकीय कामे करताना त्यांना अडचणी येतात, अशा सर्व गोष्टींचा विचार करून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महिलांसाठी ज्ञानज्योती शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
सारिका भंडलकर पुढे बोलताना म्हणाल्या, की या उपक्रमांतर्गत महिलांना किमान दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचे अत्यल्प दरात फॉर्म भरून घेऊन त्यांना बहि:स्थ पद्धतीने दहावी किंवा बारावीला प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच त्यांना पुस्तकेही पुरविण्यात येणार आहेत. त्यांची या विषयाची तयारी करून घेण्यासाठी विविध विषयावर व्याख्याने, तयारी सत्र, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. जेणेकरून ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, या उक्तीला अनुसरून त्यांचे शिक्षण पूर्ण होईल, तसेच त्यांचा सामाजिक, कौटुंबिक स्तर उंचावेल, त्यांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊन आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होतील.
याबाबत अधिक माहितीसाठी सारिका कृष्णा भंडलकर (गमरे) यांच्याशी 9561383838 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.