तीनचा प्रभाग फायनल आणि निर्णय कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

.

.पुणे : आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय कायम राहणार आहे, असं सांगतानाच तीन प्रभागांचा फायदा नक्की कुणाला होतो ते पाहू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं.

शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभार रचना केली जाण्याची शक्यता असते. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा असं माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. त्यातून प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय होत नव्हता. पण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 75 तास लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे. सीएसआरमधून 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत. पुणे शहरात एक लाख सिरींज घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातही सिरींज देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेत कोरोनाबाधितांचा रेट 2.1 टक्के आहे. मागच्यावेळीपेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्युदर 2.1 वर आला आहे. पिंपरीचा मृत्युदर थोडासा वाढला आहे, असंही त्यांनी सांगितलं

. पुण्यात मागील आठवड्यात 5 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. दुसऱ्या डोस घेतल्यानंतर नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित वाढत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, असं सांगतानाच पुण्यातील सक्रिय रुग्णांमध्ये 19 टक्के घट झाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नगरमध्ये गावबंदी करायची असेल तरी करा, असं सांगतानाच नगरमध्ये रुग्ण नेमके कुठले आहेत ते तपासण्याचे आदेशही पवार यांनी दिले.

Latest News