वायसीएम रूग्णालयात औषध नसल्याने रूग्णाची हेळसांड ।नगरसेविका सुलक्षणा धर

वायसीएम रूग्णालयात औषध नसल्याने रूग्णाची हेळसांड ।नगरसेविका सुलक्षणा धस

      पिंपरी (प्रतिनिधी)   पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची खरेदी करण्यात विलंब होत आहे. तसेच  ६० कंत्राटी परिचारिकांची मुदत संपल्याने कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून याकडे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याने रूग्णाची हेळसांड होत असल्याचा आरोप नगरसेविका सुलक्षणा धस यांनी केला आहे

           पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएममध्ये अल्प दरात उपचार होत असल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात उपचारासाठी गर्दी होते. पिंपरी-चिंचवड, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयात आल्यानंतर चांगले उपचार मिळेल अशी रुग्णांमध्ये आशा असते; मात्र औषधांचा नेहमीचाच तुटवडा व डॉक्टर्स आणि नर्सेस ची कमतरता यांमुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत.  रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण पाहता डॉक्टर्स,नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांपासून तुटवडा आहे. त्यातच कंत्राटी पद्धतीवरील ६० महिला परिचारिकांची मुदत संपली असून सध्या ७० नर्सेसची कमतरता आहे. मुळात जुन्या कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वीच नवी उपाययोजना करून जाहिराती, परीक्षा आणि कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे आहे. पण अद्यापही केवळ नवीन कर्मचाऱ्यांची परीक्षा झालेली असून भरतीबाबत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे कोणतेच उत्तर नाही. त्यामुळे आणखी किती दिवस रुग्णांना रामभरोसेच राहावे लागणार आहे असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक व्यक्‍त करत आहेत.

          ऐन पावसाळ्याच्या दिवसांत शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून वायसीएम रुग्णालयात रुग्णांची वर्दळ वाढली आहे त्यातच रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची पुरेशी खरेदी केली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये  नेहमीच औषधांचा साठा अपुरा पडतो. कधीच औषधे मिळत नसल्यामुळे रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषधे आणायला लावली जात आहेत. त्यामुळे खाजगी औषधविक्रेत्यांचे खिसे भरण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जाणीवपूर्वक रुग्णांना औषधे उपलब्ध करून देत नसल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत.  परिणामी महापालिकेच्या या उदासीन कारभारामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.   उपचारासाठी सोयी सुविधांच्या अभावाने अनेकांना पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले जात आहे. त्यामुळे ते रुग्णांच्या जिवावर बेतत आहे. वायसीएममध्ये रेबिजच्या लसींचा साठाही कमी पडत आहे. कुत्रा चावल्यानंतर अनेक जण रेबिजचे इंजेक्शन घ्यायला वायसीएममध्ये जातात. त्यांना लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. काही जण खासगी रुग्णालयात जाऊन अधिकचे पैसे मोजून लस घेत आहेत, तर अनेकांना ससूनमध्ये जावे लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी सुरू केलेल्या या रुग्णालयात उपयोग काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. सध्या टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया,स्वाईन फ्लू अशा जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच शहरातील सर्वात मोठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वायसीएम कडे सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना हजारो रुपयांची औषधे खाजगी औषध विक्रेत्यांकडून विकत घ्यावी लागतात. रुग्णालयांत औषधे का उपलब्ध होत नाहीत यामागे नक्की काय गौडबंगाल आहे याची चौकशीही झाली पाहिजे त्यातच कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असून हे प्रशासन आणि सत्ताधारी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत.

Latest News