रामकृष्ण चौकातील बेटाचे काम ठप्प; अपघातांना निमंत्रण देणाऱ्या बेटाची उंची कमी करा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी…


पिंपरी, प्रतिनिधी :
पिंपळे गुरव दापोडी रस्त्यावर रामकृष्ण मंगल कार्यालय चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना चौक पार करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी वाहतूककोंडीत भर पडली आहे. या चौकातील सुशोभीकरण करण्यात येणाऱ्या बेटाचा आकार कमी करून काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
रामकृष्ण मंगल कार्यालय चौक हा पिंपळे गुरवमधील महत्त्वाचा चौक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चौकात बेट उभारण्याचे काम सुरू होते. मात्र, सद्यस्थितीत हे काम बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी अगदी चौकातच जनरेटर उभा करून ठेवला आहे. याचा फटका मोठ्या वाहनांना बसत आहे. अनेकदा पीएमपीएमएल’ला अडकूल बॅरिगेट फरफटत गेले आहेत. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, तरीही हे काम जैसे थे अवस्थेत ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे चौकातील बेटाच्या जास्त उंचीमुळे चौकात समोरासमोर वाहने येण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे चारचाकी सोबतच दुचाकी एकमेकींना धडकून अपघात घडत आहेत. त्यामुळे या बेटाची उंची कमी करण्याची मागणीही राजेंद्र जगताप यांनी केली आहे.