महिलांमधील आत्मनिर्भरता व आर्थिक सक्षमतेचे दर्शन घडविणारी ही जत्रा – खासदार सुप्रिया सुळे

sule

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ग्रामीण भागातील महिलांची आत्मनिर्भरता दाखविणारी व आर्थिक सक्षमता सिद्ध करणारी ही जत्रा प्रेरणादायी असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे व्यक्त केले.
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत महाराष्ट्र जीवन उन्नती अभियानांतर्गत आयोजित दख्खन जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त (विकास) विजय मुळीक, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली घुले, मुळशी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संदीप जठार, गट विकास अधिकारी (नरेगा) स्नेहा देव ,लेखाधिकारी (एमएस आरएलएम) रविंद्र पोफळे, अधिक्षक प्रशांत दीक्षित आदी यावेळी उपस्थित होते.
येथील गोळीबार मैदानावर आयोजित पुणे विभागातील १८० महिला बचत गटांनी या दख्खन जत्रेत सहभाग घेतला असून २० फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या जत्रेमध्ये शाकाहारी, मांसाहारी विविध खाद्यपदार्थांच्या मेजवानी बरोबरच महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध खाद्योपयोगी व घरगुती वस्तू विक्रींचे भव्य प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे. पुणे, सातारा ,सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातून उमेद अंतर्गत नोंदणी झालेल्या महिला बचत गटांनी पुणेकरांना खाद्यपदार्थांबरोबरच फिरणे आणि विविध पाककलांचा आस्वाद घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी, दख्खन जत्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्टॉलला भेट देऊन माहिती घेत महिला सक्षमीकरणाच्या या अनोख्या उपक्रमाला दाद दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावच्या स्वयंसहाय्यता केंद्राच्या महिलांनी बचत गटाचे महत्व सांगणारी नाटिका सादर केली. त्यानंतर “मी उद्योजिका कशी झाले? या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये १७ महिलांनी भाग घेऊन आपल्या यशस्वी कारकीर्दीची माहिती व्यासपीठावरून येऊन मांडली. दख्खन जत्रेमध्ये कोंबडी वडे कोल्हापुरी मटन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मांदेली फ्राय ,बेबी सुरमई फ्राय या खाद्यपदार्थांच्या स्टॉल बरोबरच विविध प्रकारचे जाम, चटण्या, कुरडई ,पापड या स्टॉलला देखील खवय्ये भेट देत होते.
आशिष जराड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रवींद्र पोफळे यांनी आभार मानले.

Latest News