अरविंद एज्युकेशन सोसायटीत पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेती संकल्पनेवर प्रयोग सादर करीत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विज्ञानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनेवर आधारित प्रयोग सादरीकरण करून विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विज्ञान प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहाच्या सभागृहात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाट्यपरिषद चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, सुमीत मुंगसे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, शिक्षिका शारदा पोफळे, स्मिता बर्गे, सुनीता ठाकूर, हर्षदा वाजे, अश्विनी वाघमारे, श्रद्धा पांढरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध प्रकारचे इकोसिस्टम आणि त्यांचे परस्पर संबंध, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरण प्रदूषण व विनाश, पर्यावरणीय प्रदूषनाला कारणीभूत घटकावर उपाय, शाश्वत कृषी पद्धतींचे नवीन मार्ग यावर आधारित पहिली ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग सादर केले. यामध्ये सेव्ह अर्थ, सुका आणि ओला कचरा, जल प्रदूषण, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट, सोलर पॅनेल, प्लास्टिक रिसायकलिंग, टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर, टाइडल एनर्जीद्वारे वीज निर्मिती, भूकंप आणि त्याचे परिणाम, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन, जंगलतोडीचे दुष्परिणाम, जलशुद्धीकरण प्रकल्प, टिश्यू कल्चर, ग्लोबल वार्मिंग आणि त्याचे परिणाम, श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसाचा कर्करोग आदी विषयावर आधारित वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.
खासदार बारणे म्हणाले, की विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक मार्गदर्शन मिळावे, या हेतूने भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनातून मोठी जनजागृती होण्यास मदत होणार आहे. एक वेगळी संकल्पना हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जाणार आहे.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, की विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे वैज्ञानिक प्रयोग दखल घेण्याजोगे आहेत. विद्यार्थ्यांना मोबाईल जगातून बाहेर काढल्यास त्यांच्या हातून समाजहिताच्या गोष्टी घडतील.
अतुल शितोळे यांनी सांगितले, की विद्यार्थी दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन विज्ञान प्रयोग सादर करतात, ही चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती होते आहे, याचीच प्रचिती हे प्रयोग पाहून येते.
आरती राव म्हणाल्या, की अरविंद एज्युकेशन सोसायटी पर्यावरणाप्रती नेहमीच संवेदनशील राहिली आहे आणि गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक दृष्टिकोन रुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच दृष्टीने पुणे क्लायमेट वॉरियरने आमच्याशी पर्यावरण संवर्धनासाठी करार केला आहे.
सुमीत मुंगसे यांनीही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे कौतुक केले. पर्यावरण व शाश्वत शेती विषयाची विद्यार्थ्यांनी घेतलेली दखल कौतुकास्पद आहे.
प्रणव राव म्हणाले, की यंदा विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनेवर आधारित प्रयोग करून घेऊन त्यांचे सादरीकरण केले. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.
सूत्रसंचालन शिक्षिका अश्विनी वाघमारे यांनी केले.