नवरात्री नवतरंग’ ला चांगला प्रतिसाद,कथक, जेंबेच्या फ्युजनचे विलोभनीय दर्शन


*’नवरात्री नवतरंग’ ला चांगला प्रतिसाद*………….*कथक, जेंबेच्या फ्युजनचे विलोभनीय दर्शन*
!पुणे : भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘नवरात्री नवतरंग ‘ या बहारदार कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कथक नृत्यातील ताल प्रस्तुती दक्षिण आफ्रिकन वाद्य जेंबे या वाद्याबरोबर सादर केल्याने फ्युजन स्वरुपातील या नाविन्यपूर्ण रचनेला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
नृत्यवेध कथक नृत्य संस्थेच्या संस्थापिका डॉ. माधुरी आपटे आणि शिष्यांच्या कथक नृत्याला पुण्यातील प्रसिद्ध जेंबे वादक नितीन सातव यांनी जेंबे वादनाची आणि रोहित कुलकर्णी यांनी सिंथेसायजरची साथ केली. डॉ. माधुरी आपटे आणि संस्थेच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्यातील नवनवीन संरचना सादर केल्या.
ज्यामध्ये सरस्वती वंदना, त्रिताल, होरी, भजन, तराणा अशा काही पारंपारिक रचनाचा समावेश होता.तसेच पंडित कुमार गंधर्व यांच्या गीतवर्षा मधील बंदिशीवर हातात कळशी घेऊन अप्रतिम असे नृत्य सादर झाले.
या विशेष प्रस्तुती मध्ये नृत्यांगनांनी स्वतः जेंबे वाजवून नृत्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या आवाजातील ‘जो भजे हरी को सदा’ या भैरवीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन स्वानंद पटवर्धन यांनी केले.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा १८५ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवन(सेनापती बापट रस्ता ) येथे शनीवार, दि.२१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम झाला.