भोसरीत रंगणार महिलांसाठी इंद्रायणी थडी जत्रा – आमदार महेश लांडगे यांची संकल्पना


पिंपरी, पुणे (दि. 21 जानेवारी 2019) शिवांजली सखी मंचने संयोजन केलेल्या आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘इंद्रायणी थडी’ चे उद्घाटन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8 फेब्रुवारी) करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, उपहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, यांच्यासह शहरातील नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार महेश लांडगे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा स्विनल म्हेत्रे, शिक्षण मंडळ अध्यक्षा सोनाली गव्हाणे आदींसह अनेक महिला नगरसेविका उपस्थित होत्या.
पूजा लांडगे यांनी सांगितले की, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांमधील अंगभूत गुणकौशल्य विकसित व्हावेत या उद्देशाने यासाठी कला, क्रिडा, संस्कृती, उद्योजकता, रोजगार, आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यातून महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात दिनांक 8, 9, 10 आणि 11 फेब्रुवारी 2019 असे चार दिवस ही जत्रा भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर भरवण्यात येणार आहे. याची पूर्व तयारी म्हणून भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध बचतगटांशी प्रभाग निहाय बैठका घेऊन गटचर्चा केली जात आहे. त्याद्वारे अधिकाधिक महिला बचत गटांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका महिला व बाल कल्याण विकास समितीच्या सभापती स्विनल म्हेत्रे यांनी पवना थडीच्या अनुभवातून इंद्रायणी थडीच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटांद्वारे, महिलांनी स्वत: तयार केलेल्या उत्पादनांसाठी या जत्रेमध्ये स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बचत गटांच्या विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरण चळवळीला चालना देण्यासाठी या जत्रेचे नियोजन केले आहे, अशीही माहिती पूजा लांडगे यांनी दिली. या इंद्रायणी थडीमध्ये पहिल्यांदाच लहान मुलांसाठी बालजत्रा, महिलांसाठी भजन स्पर्धा, गावरान खाद्य महोत्सव, महिला आरोग्य शिबीर, फॅशन शो, डान्स स्पर्धा, महिला उद्योजकता मार्गदर्शन, होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांसाठी पारंपरिक खेळ, महिलांसाठी जॉब फेअर, योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. यासाठी महिला बचत गटांनी नि:शूल्क स्टॉल बूक करावेत. स्टॉल बूकिंगसाठी महिला स्वतंत्र व्यवसाय करत असेल, तर स्वत:चे आधार कार्ड, पॅनकार्ड आवश्यक आहे. तसेच, बचतगटांसाठी बचतगटांचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच समाविष्ट महिलांची नावे व मोबाईल क्रमांक द्यावेत.
शितलबाग, भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्टॉल बूकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी संदीप ठाणेकर (7720043860) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 30 जानेवारीपर्यंत स्टॉल बूकिंग करता येतील. मात्र कोणत्याही ब्रँडेड वस्तुंची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध होणार नाहीत, असेही संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.‘लकी ड्रॉ’द्वारे यात्रेमध्ये दररोज 1000 बक्षीसेसन्मान स्त्री शक्तीचागौरव भारतीय संस्कृतीचा अशा संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या इंद्रायणी थडी जत्रेमध्ये फक्त महिलांसाठी चार दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे दररोज लकी ड्रॉ आणि विशेष सहभागी झालेल्या महिला अथवा महिला बचतगटांसाठी बक्षीस देण्यात येणार आहे. दररोज सुमारे 1 हजार बक्षीसांचे वितरण करण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्याला आणखी बळकटी देण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती संयोजक पूजा महेश लांडगे यांनी दिली.इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे सादरीकरण : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी इंद्रायणी थडी जत्रेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाबाबत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्पाची इतंभूत माहिती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यापूर्वीच रिव्हर सायक्लोथॉनच्या माध्यमातून सुमारे सात हजार सायकलपटूंनी जगजागृती रॅली काढून इंद्रायणीच्या संवर्धनाचा संदेश दिला होता. तसेच, भोसरी व्हीजन-2020, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरात राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि पूर्ण केलेल्या विकासकामांची माहितीही देण्यात येणार आहे.