पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाहनांव्दारे साफसफाईचे कामच्या निविदा प्रक्रियेला विलंब लावणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी। मारूती भापकर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रस्ते सफाई तांत्रीक पध्दतीने रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाई करण्यात येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी सरकारकडील मंजूर निधीतून ही साफसफाई केली जाते. महापालिका मालकीची आठ वाहने आणि ठेकेदार मालकीची दोन अशा दहा रोडस्वीपर वाहनांचा त्यासाठी वापर होतो. ही दहाही वाहने वेगवेगळ्या क्षमतेची आहेत. या कामासाठी महापालिकेने डी. एम. एंटरप्रायजेस आणि बीव्हीजी इंडिया या ठेकेदारांची नेमणूक केली आहे. त्यांना चार कामासाठी वाहनांच्या क्षमतेनुसार वेगवेगळे दर ठरवून देण्यात आले आहेत.
डी. एम. एंटरप्रायजेस महापालिका मालकीच्या सहा वाहनांमार्फत अंतर्गत रस्त्यांची तसेच पुणे-मुंबई महामार्गाची साफसफाई करतात. त्यांना ४० किलोमीटर कामासाठी प्रति किलोमीटर प्रति दिन २१९ रुपये दर ठरवण्यात आला आहे, तर बीव्हीजी इंडीया हे महापालिका मालकीची चार वाहने आणि त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या दोन वाहनांव्दारे रस्त्यांची साफसफाई करतात. त्यांना या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे २७१ रुपये ५० पैसे आणि २९८ रुपये ५० पैसे प्रति किलोमीटर प्रति दिन ठरविण्यात आला आहे.
नवीन निविदा प्रक्रियेसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय रोड स्वीपर वाहनांची आवश्यक संख्या तसेच रुट चार्ट आदी मागविण्यात येत आहे. ही निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरु होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यासाठी या ठेकेदारांना ठरवून दिलेल्या दरानुसार १ जाने २०१९ ते ३० एप्रिल २०१९ या चार महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याखेरीज महापालिकेने बीव्हीजी कंपनीकडून रोडस्वीपर मशिन खरेदी केली आहे. मशिन चालविण्याकरिता प्रति दिन प्रति शिप्ट ९ हजार २२५ रुपये आणि मशिन देखभाल दुरुस्तीसाठी दर महा प्रति ३४ हजार ५०० रुपये बीव्हीजीला दिले जातात.
मे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बीव्हीजी इंडिया या ठेकेदारांची रस्ते सफाईच्या कामासाठी सुरुवातीला दोन वर्षे कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती. ही मुदत ३० नोव्हें २०१७ रोजी संपली त्यांनंतर त्यांना वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली. अखेरची मुदत वाढ त्यांना २३ ऑक्टो २०१८ रोजी देण्यात आली होते. आता ही मुदतवाढ ३१ डिसें २०१८ रोजी संपुष्टात आली. सव्वा वर्षात दोनदा मुदतवाढ मिळूनही आता तिस-यांदा मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मुदतवाढीच्या कामासाठी दीड कोटी रुपये रक्कमेपेक्षा अधिक रक्कम खर्च होणार आहे.
शहरातील कचरा गोळा करणे व त्यांची वाहतूक करणे ह्या कामाबाबतही मागील दोन वर्षापासून आपण महापालिकेतील पदाधिकारी अधिकारी, नगरसेवक बीव्हीजी इंडिया या वादग्रस्त ठेकेदाराला निविदा प्रक्रियेला फाटा देऊन अर्थपूर्ण व्यवहार करुन वारंवार मुदत वाढ देण्यात आली आहे. तशाच प्रकारे रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाईच्या कामासाठी ही सव्वा वर्षापासून मुदतवाढ दिली जाते. संबंधीत हे ठेकेदार आपले जावाई आहेत का ? त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रस्ते सफाई तांत्रीक पध्दतीने रोडस्वीपर वाहनांव्दारेसाफसफाईचे काम निविदा प्रक्रिया राबवुन देणे व निविदा प्रक्रियेला विलंब लावणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी.