चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ लवकरच उभारला जाणार नवीन रेल्वे उड्डाणपूल

1004820426

चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ लवकरच उभारला जाणार नवीन रेल्वे उड्डाणपूल

वाहनचालकांसाठी प्रवास होणार अधिक सुलभ आणि सुरक्षितपिंपरी, २९ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) पाडून त्याऐवजी नवीन उड्डाणपूल बांधण्यास मान्यता दिली आहे. तज्ज्ञांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालांवर आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे जुना पूल पाडून नवीन पूल उभारल्याने येथील प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा डाव्या बाजूचा रेल्वे उड्डाणपूल १९७६ मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाच्या उजव्या बाजूला समांतर उड्डाणपूल २००४ मध्ये बांधण्यात आला आहे. तर, १९७६ मध्ये बांधण्यात आलेला जुना पूल स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कमकुवत असल्याचे आढळून आले. या ऑडिटच्या अहवालानंतर महापालिकेने जुन्या पुलावर हलकी वाहने आणि दुचाकी वगळता इतर वाहनांना जाण्यास प्रतिबंध केला.

त्यामुळे येथून जाणारी जड वाहने आणि बसेस यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर, संबंधित पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेद्वारे विविध संस्थांकडून तांत्रिक आढावा घेण्यात आला. २०२१ मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आणि २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या पुनर्वलोकनानुसार जुना पूल पाडण्याची शिफारस करण्यात आली.

त्यानंतर रेल्वे विभागाने डिसेंबर २०२४ मध्ये जुना रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी आणि नवीन पुलाच्या आधुनिक पुनर्बांधणीसाठी संमती दिली.यासंबंधी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला ४ मार्च २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला. त्यामुळे आता लवकरच येथील जुना पूल पाडून नवीन पूल उभारला जाणार असून दैनंदिन प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे..

पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. चिंचवड स्टेशनजवळील जुन्या उड्डाणपुलाला जवळपास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु तज्ज्ञांच्या मूल्यांकनातून आणि नागरिकांच्या अभिप्राय लक्षात घेऊन येथे नवीन पूल उभारण्यात येणार आहे. रेल्वे विभागाची यासाठी मंजुरी मिळाली असून येथे नवीन पूल उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे.– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका…

नवीन उड्डाणपूल उभारला गेल्यानंतर दैनंदिन प्रवाशांचा प्रवास केवळ अधिक सुरक्षितच होणार नाही, तर वेळेची बचतही मोठ्या प्रमाणात होईल. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना अधिक सुलभ आणि सुकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड

चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या पुलावरून जड वाहतूक व बसेस स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर बंद करण्यात आल्या आहेत. आता रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर येथे नवीन पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.– प्रमोद ओंभासे, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका