मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन…

ps logo rgb

(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज शनिवारी सकाळी निधन झाले. त्या केवळ ३८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील मीरारोड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रिया मराठे यांचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाणे, महाराष्ट्र येथे झाला. महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली. २००५ साली ‘या सुखांनो या’ या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले

. पुढे ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. एक वेळा त्या आजारातून सावरल्या होत्या, मात्र अलीकडे पुन्हा कर्करोगाने डोके वर काढले आणि उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले.२०१२ मध्ये अभिनेत्रीने अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी विवाह केला होता. त्यांनाही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून ओळख मिळाली. प्रिया यांना बॅडमिंटन, प्रवास आणि वाचनाची विशेष आवड होती.

ती अध्यात्मिक दृष्टिकोन ठेवणारी आणि शांत स्वभावाची व्यक्ती होती.हिंदी टेलिव्हिजनमध्ये ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘पवित्र रिश्ता’तील सहकलाकार सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या आठवणी भावनिक शब्दांत व्यक्त केल्या होत्या

.प्राजक्ता माळी यांच्यासह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. प्राजक्ता माळी यांनी म्हटले, “ती एक अत्यंत नम्र, गुणी आणि शांत मुलगी होती. देव अशी चांगली माणसं का नेतो, हा प्रश्न मला सतावतो आहे.” प्रिया मराठे यांचे जाणे म्हणजे मराठी व हिंदी मनोरंजन विश्वासाठी अपूरणीय अशी हानी आहे. त्यांच्या आठवणी, भूमिका आणि त्यांच्या साध्या, सोज्वळ स्वभावामुळे त्या कायम स्मरणात राहतील.