हॅकेथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद – डॉ. पंडित विद्यासागर


पीसीयू मध्ये हॅकेथॉन स्पर्धा संपन्न
पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविणे आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण करण्याची संधी मिळत असते. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद आहेत. हे विद्यार्थी समाजातील गंभीर आव्हानांना उत्तर देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधतील आणि भारताच्या प्रगतीत योगदान देतील, असे गौरवोद्गार नियामक मंडळ सदस्य डॉ. पंडित विद्यासागर यांनी काढले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे “स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकथॉन २०२५” आयोजित करण्यात आल्या होत्या. शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल च्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधील नाविन्य व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १०१ संघांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ६७ संघांची इंटरनल प्रेझेंटेशन फेरीसाठी निवड झाली. काटेकोर मूल्यमापनानंतर ४५ संघांची अंतिम निवड करण्यात आली तर ५ संघ प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. उद्योग – शैक्षणिक संबंध संस्था संचालक डॉ. प्रणव चरखा, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आणि डॉ. सागर पांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पीसीईटी चे कार्यकारी संचालक, पीसीयू चे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रभारी उप कुलगुरू डॉ. संदीप थेपडे व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. डॉ. अनिकेत कुलकर्णी, अमेय तांबे (टेक्नो सॅम, पुणे), डॉ. सागर शिंदे, डॉ. उमा पाटील आणि डॉ. संजीवकुमार अंगडी (नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी) यांनी परीक्षक म्हणून काम केले. अंकुश दहात यांनी समन्वयक जबाबदारी पार पाडली. इनसाईट हब क्लब सदस्य, विद्यार्थी स्वयंसेवक, प्रशासनिक कर्मचारी तसेच मार्केटिंग व डिझाईन टीम यांनी आयोजनात सहभाग घेतला. पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.