पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करतात :रुपाली पाटील


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पुण्यात सध्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, राष्ट्रवादीकडून तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवर घालावा, असे रूपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले.शनिवारवाड्यातील महिलांकडून सामूहिक प्रार्थनेचा (नमाज पठण) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या.
माहितीनुसार, पतीत पावन संघटना आणि मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आले. मात्र, पोलिसांनी या सर्व हालचालींवर मज्जाव केला. यावेळी पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, “ज्या ठिकाणी नमाज पडला गेला त्या ठिकाणी जाऊन आम्हाला शुद्धीकरण करायचे आहे.” मात्र, पोलिसांनी त्यांना शनिवारवाड्यात जाण्यापासून रोखले.
रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी सातत्यांने पुण्यातील शांतता आणि ऐक्य धोक्यात येईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्या खासदार आहेत हे त्या विसरल्या आहेत.
पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करत आहेत. कोथरूडमध्ये नाटकं केली, आता कसब्यातून पुन्हा वातावरण पेटवण्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पुण्यातील राजकीय घडामोडींना अलीकडे चांगलाच वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच, प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. रुपाली पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले, “शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही. तो मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचा आणि सर्व पुणेकरांचा आहे. खासदार बाईंनी केलेल्या कृत्यामुळे पुण्यातील सौहार्द धोक्यात येत आहे. त्यांनी शनिवारवाड्यात केलेल्या नाटकावर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा. भाजपनेही त्यांना आवर घालावा.” रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “खासदारकीची घेतलेली शपथ विसरून मेधा कुलकर्णी पुण्यातील धार्मिक वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे. प्रार्थना असो किंवा दुवा — श्रद्धा एकच असते, हे त्या विसरल्या आहेत.” अशी टिका रुपाली पाटील यांनी केली आहे.