पिंपरीत भाजपाला धक्का..! माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरीमधील प्रभाग २१ मध्ये भाजपाकडे उमेदवार असतानाही माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यासह काहीजणांचे प्रवेश करून घेतले. त्यामुळे दुखावलेल्या संदीप वाघेरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा सोमवारी (दि. २२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख नाना काटे उपस्थित होते.२०१७ सालच्या निवडणुकीमध्ये पिंपरीतील प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपाचे संदीप वाघेरे निवडून आले होते. त्यांच्या विरोधात असलेल्या प्रभाकर वाघेरे यांचा त्यांनी पराभव केला होता. आता त्याच प्रभाकर वाघेरे यांना भाजपने पक्षात घेतले असून उमेदवारीचा शब्दही दिला आहे.
त्यासोबत माजी महापौर संजोग वाघेरे, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाला संदीप वाघेरे यांनी विरोध केला होता. निवडून आल्यापासून गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून त्या विकासकामांच्या जोरावर आपण येथे भाजपाचे पॅनल विजयी करू असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. मात्र, तरीही गावातील प्रमुख विरोधक असलेल्यांनाच पक्षात स्थान देण्यात आले. त्यामुळे संदीप वाघेरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
