पिंपरीतील भाजपमध्ये अस्वस्थता,आयारामा विरोधात हजारो निष्ठावान उतरले रस्त्यावर…

पिंपरीतील भाजपमध्ये अस्वस्थता,
आयारामा विरोधात हजारो निष्ठावान उतरले रस्त्यावर…
पिंपरी: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-भारतीय जनता पक्षात शनिवारी इतर पक्षातून आजी-माजी पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिल्याबद्दल पिंपरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. आयारामाविरोधात निष्ठावान रस्त्यावर उतरले. रविवारी दुपारी आत्मक्लेष आंदोलन केले.
भारतीय जनता पक्षामध्ये महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर इतर पक्षातून २२ जणांना प्रवेश दिला आहे. मुंबईतील प्रवेशानंतर पिंपरीतील आयारामांना प्रवेश दिल्याबद्दल भाजपमध्ये अस्वस्थता आहे.
पिंपरीतील भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या समर्थकांनी रविवारी दुपारी एक वाजता गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमा झाले. त्यामध्ये परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्याचबरोबर विविध सेवाभावी संस्था संघटना आणि कार्यकर्ते यांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
निष्ठावान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आयारामांना प्रवेश दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्ष नेतृत्वाने आयारामांना थारा देऊ नये, निष्ठावंतांना न्याय द्यावा अशी मागणी केली. कार्यकर्त्यांनी संदीपभाऊ वाघेरे जो निर्णय घेतील त्या निर्णयास आमचा ठाम पाठींबा असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वाघेरे म्हणाले कि, “मी पैसे कमवण्यासाठी किंवा घर भरण्यासाठी राजकारणात आलेलो नाही तर समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करण्यासाठी आलो आहे ” काही व्यक्तींच्या पक्षप्रवेशाला आपण आधीच पक्षाकडे विरोध दर्शवला होता. माझी उमेदवारी कट करण्याचा डाव रचला जात असून, आजपर्यंत मला अडचणीत आणण्याचेच काम सातत्याने केले गेले आहे. “हिंदुत्व हेच माझं डीएनए आहे. दगा-फटक्याचं राजकारण करणारी ही मंडळी आजपर्यंत जनतेला फसवत आली आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
प्रभागातील विकासकामांचा उल्लेख करत वाघेरे यांनी सौदागर ब्रिज, रेल्वे उड्डाणपूल यांसह प्रत्येक विकासकामाला जाणीवपूर्वक विरोध केल्याचा आरोप केला. “ज्यांनी प्रत्यक्षात विकासकामे केली, त्यांनाच घरी बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असेही ते म्हणाले.
यावेळी आक्रमक शैलीत बोलताना त्यांनी, “यांची वृत्ती अफजलखानाची असेल, तर मला शिवाजी महाराज व्हावे लागेल,” असे विधान करत उपस्थितांमध्ये जोश भरला.
नागरिकांना आवाहन करताना संदीप वाघेरे म्हणाले, “लोकांची काम करणारे चार नगरसेवक निवडायचे की घर भरणारे निवडायचे, हा निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही मला साथ द्या, माझ्यासोबत चौघे निवडून द्या. फक्त पाच वर्षे नाही, तर सदैव मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहीन.”
या वक्तव्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले.
