“निवडणुकीत मातंग समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्या; डावललं जाण्याची भावना तीव्र” – हिंदू मातंग संघ

पुणे, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- २४ डिसेंबर २०२५
पिंपरी-चिंचवड शहरात मातंग समाजाची लोकसंख्या सुमारे ३० ते ३५ टक्क्यांच्या दरम्यान असूनही, विविध राजकीय पक्षांकडून समाजाला पुरेशे प्रतिनिधित्व मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मातंग समाजाला योग्य, पुरेसं आणि सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन हिंदू मातंग संघातर्फे करण्यात आले.
या संदर्भात हिंदू मातंग संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष व मुख्य प्रवक्ते युवराज दाखले यांनी सांगितले की,
“मातंग समाज शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात असूनही, राजकीय स्तरावर आम्हाला कायम दुर्लक्षित केले जाते. आगामी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणात मातंग समाजाला अग्रक्रम द्यावा. प्रतिनिधित्व हा आमचा हक्क असून, तो आम्हाला आदरपूर्वक मिळालाच पाहिजे.”
हिंदू मातंग संघाने सर्व राजकीय पक्षांना विनंती केली आहे की, समाजातील पात्र आणि सक्षम नेतृत्वाला संधी देऊन व्यापक सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करावी असे दाखले यांनी मागणी केली आहे.
