प्रभाग क्रमांक २३ मधील रेखाताई नरेंद्र माने वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार

वंचित चे शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी प्रभाग क्रमांक २३ मधील उमेदवार सौ रेखा नरेंद्र माने यांना जाहीर केला पाठिंबा!
पिंपरी (प्रतिनिधी) दि.२ जानेवारी २०२६:– (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) प्रभाग क्रमांक २३ मधील अनुसूचित जाती महिला अपक्ष उमेदवार रेखाताई नरेंद्र माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पाठिंबा दिल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी केली. पिंपरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उमेदवार रेखा नरेंद्र माने, वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष विनोद गायकवाड, नरेंद्र माने, विकास गाडे, कैलास राऊत, अमोल सावदेकर व कार्यकर्ते इत्यादी या वेळेस उपस्थित होते.
यावेळी गवळी म्हणाले की, प्रभाग क्रमांक २३ च्या अपक्ष अनुसुचित जाती महिला उमेदवार रेखाताई नरेंद्र माने यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करत आहोत.कारण त्यांनी लोकशाही मार्गाने शासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवला आहे. ही खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीची भूमिका आहे.आजच्या राजकारणात अशी प्रामाणिक, निर्भीड आणि जनतेसाठी झटणारी व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून आवश्यक आहे.पक्षीय राजकारणापेक्षा जनतेचा प्रश्न महत्त्वाचा मानणाऱ्या रेखाताई माने यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर आणि ठाम पाठिंबा आहे. शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने त्यांना निवडून आणावे असे आवाहन करतो.
उमेदवार रेखाताई माने म्हणाल्या की, पती नरेंद्र माने यांच्या सोबतीने प्रभाग क्रमांक २३ मधील थेरगाव, साईनाथनगर व पडवळनगर भागात अनेक वर्षांपासून विकासकामे केली आहेत.सन २०१७ ते २०२५ या कालावधीत संजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना चिंचवड विधानसभा क्षेत्रातील ३,७४० निराधार नागरिकांना पेन्शन तसेच थेरगाव परिसरातील ३५० हून अधिक विधवा महिला, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५५ कुटुंबांना हक्काची घरे मिळवून देण्यात आली.आली.दिनांक १५ मे २०२५ रोजी जाहीर झालेल्या सुधारित डी.पी. प्लॅनमधील २४ व ३० मीटर रस्त्यांमुळे दाट वस्तीतील नागरिकांची घरे धोक्यात आली असून, त्याविरोधात प्रशासनाविरुद्ध मोर्चे, आंदोलने व “घर वाचवा – माणूस वाचवा” ही ठाम भूमिका घेतली.या मुद्द्यावर तब्बल १२,००० हरकती नोंदवून नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यात आला.
५० ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना ७/१२ उतारे व प्रॉपर्टी कार्ड नसल्याने विस्थापनाचा धोका आहे. या नागरिकांचे घर व हक्क वाचवण्यासाठीच माझा लढा आहे.सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना विरोध केल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी नाकारण्यात आली.मात्र जनतेचा विश्वास कायम असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.सामाजिक कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. प्रभाग २३ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून ते नक्की मतदान करतील अशी अपेक्षा आहे माने यांनी व्यक्त केली.
रेखाताई नरेंद्र माने यांनी केवळ भाषणात नाही तर प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला आहे. घरबांधणी, विस्थापनाचा धोका, निराधार नागरिकांचे प्रश्न, विधवा व ज्येष्ठांचे हक्क या सर्व मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाशी संघर्ष केला असल्याने त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा दिला असून प्रभाग क्रमांक २३ मधील तरुण कार्यकर्ते त्यांना मतदान करतील असे मत युवा अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.
