काट्यांची लढाई, पण प्रभागाला हवे विकासाचे हात!

Backup_of_Backup_of_ps logo rgb

    पिंपळे सौदागर | प्रतिनिधी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये यंदाची निवडणूक केवळ चिन्हांची नव्हे, तर विश्वासाची परीक्षा ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश काटे आणि भाजपचे शत्रुघ्न बापू काटे – नाव वेगळं असलं तरी दोघांची कार्यपद्धती मात्र मतदारांच्या मते “सारखीच निराशाजनक” ठरत आहे. अनेक वर्षे सत्तेच्या जवळ राहूनही प्रभागातील मूलभूत प्रश्न सुटले नाहीत, अशी तीव्र भावना नागरिकांत उमटताना दिसत आहे.
    रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज लाईनचे वारंवार तुंबणे, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव, उद्याने व खेळाची मैदाने यांची दयनीय अवस्था – हे सारे प्रश्न दोन्ही ‘काटे’ सत्तेच्या जवळ असतानाही सुटले नाहीत. त्यामुळे “काटे बदलले, पण वेदना तशाच” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

    उमेश काटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळा’वर लढत असले तरी नवा चेहरा यांचा प्रभाव पडत नाही. आणि नवखे असल्याने त्यांना स्थानिक पातळीवर काम करण्याची कार्यपध्दती माहिती नाही. तर दुसरीकडे भाजपचे शत्रुघ्न काटे ‘कमळ’ घेऊन मैदानात असले तरी केंद्र व राज्यातील सत्ता असूनही प्रभागातील प्रश्न सुटले नाहीत, यामुळे भाजपविरोधातही नाराजी वाढली आहे.

    या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विशाल जाधव ‘पंजा’ या चिन्हासह नव्या आशेचा किरण म्हणून पुढे येत आहेत. “काट्यांच्या राजकारणाला आता पूर्णविराम हवा,” असे सांगत जाधव यांनी थेट जनतेत संवाद सुरू केला आहे.
    घराघरात जाऊन ते स्थानिक प्रश्न ऐकत असून, पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व शिक्षण या मूलभूत मुद्द्यांवर ठोस आराखडा मांडत आहेत.

    विशेष म्हणजे, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशाल जाधव यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. “आम्हाला पक्ष नाही, काम करणारा माणूस हवा,” ही भावना मतदारांमध्ये ठळक होत आहे. त्यामुळे दोन्ही ‘काट्यांच्या’ विरोधात वातावरण तयार होत असून, काँग्रेसचा ‘पंजा’ प्रभाग २८ मध्ये बळकट होत चालला आहे.

    एकूणच, यावेळी मतदार “काटे नको, विकासाचे हात हवेत” असा स्पष्ट संदेश देण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग २८ मध्ये परिवर्तनाची चाहूल लागली असून, काँग्रेसचे विशाल जाधव हेच त्या परिवर्तनाचे चेहरा बनताना दिसत आहेत.