वृक्ष लागवड कार्यक्रमाव्दारे सामाजिक, आर्थिक व भावनिक बंध जोडणे गरजेचे – प्रधान सचिव विकास खारगे


पुणे दि. 22 : यावर्षी राज्यासाठी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टय आहे. हा कार्यक्रम केवळ हरित महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर आर्थिक फायदाही त्यात दडला आहे. वृक्षलागवड कार्यक्रमाव्दारे सामाजिक, आर्थिक, रोजगार निर्मिती व भावनिक बंध असे अनेक कंगोरे जोडणे गरजेचे आहे, असे मत वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केले.
2019 यावर्षासाठी महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, त्यासंबंधी पुणे विभागाचा आढावा घेण्यासाठी श्री. खारगे पुणे येथे आले होते. कौन्सिल हॉलच्या सभागृहात आयोजित या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) डॉ. एस. एच पाटील, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, पुणे वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक (वनीकरण प्रदेश, नागपूर) जे. पी. त्रिपाठी, सामाजिक वनीकरण पुणे वृत्ताचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, श्वेता सिंघल, राजेंद्र भोसले, व्ही. एन. काळम – पाटील, अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे सुरज मांढरे, कैलास शिंदे, डॉ. राजेंद्र भारुड, अभिजीत राऊत, अमन मित्तल, पुणे उपवनसंरक्षक श्रीमती श्रीलक्ष्मी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी. शिवदास तसेच वने, सामाजिक वनीकरण व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हानिहाय माहिती घेतल्यानंतर श्री. खारगे म्हणाले, वृक्ष लागवड कार्यक्रम सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य होणार नाही. मागील तीन वर्षात या मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळाला. कारण या मोहीमेचा शुध्द हेतू आहे आणि यात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. बांबू, चिंच, तुतीच्या वृक्ष लागवडीने शेती उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय यामुळे रोजगारही उपलब्ध होतो. यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्व सर्वांना पटवून देण्याची आवश्यकता आहे.
श्री खारगे म्हणाले, आपापल्या जिल्ह्याने केलेल्या लागवडीची, निर्माण केलेल्या रोपांची माहिती वेबसाईटवर वेळेत अपलोड करावी, जेणेकरुन लोकांना वस्तुस्थिती कळेल. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यांचा आढावा घेताना वृक्षलागवडीचा आढावा घ्यावा. आपण ज्या ठिकाणी दौऱ्यावर जातो, त्या ठिकाणची वृक्ष लागवडीची परिस्थिती जाणून घ्यावी. नियमितपणे झाडाला पाणी देण्यात येते की नाही. ट्री गार्ड आहे किंवा नाही, या बाबी पाहायला हव्यात.
यावर्षीची वृक्ष लागवड मोहिम 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 या तीन महिन्यांच्या कालावधीत राबवायची आहे. तथापि, त्यानंतर किंवा त्याआधी लावलेल्या वृक्षांची नोंद उद्दिष्टांमध्ये घेण्यात येईल, असे स्पष्ट करुन श्री. खारगे म्हणाले, बांबूवर आधारित उद्योग वाढले आहेत. बांबूपासून फर्निचरच नव्हे तर बांधकाम व पायाभूत सुविधांसाठी देखील बांबूचा उपयोग करण्यात येत आहे. शाळा, दवाखाने, कार्यालये याठिकाणी सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. नद्यांच्या काठावर वृक्ष लागवड केल्यास नद्यांच्या पुनरुज्जीवनास निश्चितच मदत होईल.
शासनाने सुरु केलेल्या कन्या वनसमृध्दी योजनेव्दारे मुलीच्या जन्मानंतर शेतकऱ्याला 5 सागाची व 5 फळझाडांची रोपे भेट म्हणून देण्यात येतात.मुलींच्या जन्माच्या स्वागताचा संदेश देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणी साठी सर्व शासकीय विभागांनी सामाजिक वनीकरण विभागाला सहकार्य करावे. तसेच “मियावाकी दाट जंगल प्रकल्प” शहरी भागातील उपलब्ध जागेत, स्वर्गीय उत्तमराव पाटील उद्यानांमध्ये व शाळांच्या आवारात राबवावा तसेच कागद निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या बांबू, सुबाभूळ, निलगिरी, मीलिया डुबिया या वृक्षांची लागवड करावी, असे त्यांनी सांगितले. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आपण अनेक नाविन्यपूर्ण कामे करु शकतो, हे सांगताना त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा सलग चिंचवन, बांबूवन, आमराई वन, इत्यादी वने आपण करु शकतो. असे सांगितले. दुष्काळी परिस्थितीतही पाण्याच्या बाटलीव्दारे झाडांना पाणी पुरविण्याच्या पुणे वन विभागातील उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये ग्रीन आर्मी सदस्यांचाही सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले.
जून 2016 पासून 1 कोटी वृक्ष लागवडीने सुरु झालेली ही मोहीम आता 33 कोटीपर्यंत पोहचली आहे. आपण दरवर्षी उद्दिष्टांपेक्षा जास्तच काम करुन दाखविले आहे. यावर्षीचे उद्दिष्टही आपण निश्चितच पूर्ण कराल, असा विश्वास आहे. मात्र सर्वांनी सूक्ष्म नियोजन करुन ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन श्री खारगे यांनी शेवटी केले.
सादरीकरण
यावेळी जिल्हानिहाय सादरीकरण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागाला 5 कोटी 47 लाख 51 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून निश्चितपणे हे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या 1 कोटी 52 लक्ष 38 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते आम्ही निश्चित पूर्ण करु असे सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांनीही केलेल्या नियोजनाबाबतची माहिती दिली.
सातारा जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी जिल्ह्यात 1 कोटी 24 लक्ष 750 चे उद्दिष्ट असल्याचे सांगून सूक्ष्म नियोजन केल्याचे सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनीही वृक्ष लागवडीच्या कार्यवाहीची माहिती दिली.
सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम – पाटील यांनी 72.29 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारी व नियोजनासंबंधी माहिती दिली. मनपा आयुक्तांनीही महापालिकेच्या याविषयीच्या कामाची माहिती दिली.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी जिल्ह्यात 1 कोटी 13 लक्ष 30 हजाराचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती दिली.
सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्याला 85.52 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून जिल्हास्तरावर बैठका घेण्यात आल्या असून सर्व नियोजन केले असल्याचे सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही त्यांच्या तयारीविषयी माहिती दिली.
बैठकीला वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, रेशीम उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.