जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडयाची अंमलबजावणी करावी – डॉ. दीपक म्हैसेकर यांची सूचना


पुणे दि. २२ : पुणे विभागातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडयाची वेळेत आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केली.
दुष्काळ परिस्थिती, चारा टंचाई व पाणी टंचाई बाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावर बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. बैठकीला पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, श्वेता सिंघल, राजेंद्र भोसले, व्ही. एन. काळम – पाटील, अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुक्रमे सुरज मांढरे, कैलास शिंदे, डॉ. राजेंद्र भारुड, अभिजीत राऊत, उपायुक्त (महसुल) प्रताप जाधव, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी. शिवदास तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहून काम करणे गरजेचे आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाच्या आठ उपाययोजनांची अंमलबजावणी कटाक्षाने करावी. नळपाणी दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने करावीत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा.
टंचाई परिस्थिती मध्ये जनावरांना निकषानुसार चारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी संभाव्य चारा छावणीसाठी जागा, या ठिकाणी पाण्याची सोय, उपलब्ध विहिरी याबाबत माहिती घ्यावी.
शहरी भागात आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. टँकर द्वारे पाणी पुरवण्यासाठी आवश्यक जलस्त्रोतांची माहिती घेवून यासाठी योग्य ते नियोजन करावे. मनरेगाची मंजूर कामे गरजूंना उपलब्ध करुन देवून रोजगार द्यावा, अशा सूचना करुन डॉ. म्हैसेकर म्हणाले, महसूल, कृषी आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा, जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून काम करावे. तसेच टंचाई बाबतच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांतील उपलब्ध पाणीसाठयाची जिल्हानिहाय माहिती यावेळी त्यांनी घेतली. संबंधित जिल्ह्यात चारा व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येणा-या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीत दिली.