पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनावं- उपमुख्यमंत्री श्रीमती पवार

Backup_of_Backup_of_ps logo rgb

पुणे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

ग्रँड टूर २०२७ चे उद्दिष्ट केवळ गेल्या वर्षाची पुनरावृत्ती करणे एवढेच नसल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, अगदी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत, तळागाळापर्यंत ही स्पर्धा पोहोचलेल्या गतवर्षीच्या ‘पुणे ग्रँड टूर’चा आनंद सर्वांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाने ही स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. या ग्रँड टूरची संकल्पना, त्यामागील दूरदृष्टी आणि उपक्रम प्रत्यक्षात आणण्याचा पाया तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी रचला. पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनावं, महाराष्ट्रातील युवकांना सायकलिंगसारख्या उत्कृष्ट क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण व्हावे ही त्यांची दूरदृष्टी होती, असेही त्या म्हणाल्या.सर्व विभाग, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवक आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी आदी अनेक यंत्रणा, विभाग, विविध भागधारक यांनी मर्यादित कालावधीमध्ये एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या काम केल्याने ही अतिशय सुंदर अशी स्पर्धा पार पडली, असेही त्या म्हणाल्या. आगामी स्पर्धेमुळेही आपल्या ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक स्थळे जगाच्या पटलावर येऊन पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावर्षी आयोजित केलेल्या पहिल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचे आव्हान अत्यंत कमी कालावधीत साध्य केले. आता पुढील वर्षीच्या दुसऱ्या पर्वाच्या आयोजनाच्या माध्यमातून या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अजून पुढे न्यायचा असून नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. तयारीचा आढावा व निर्णय घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला, पीएमआरडीएच्या अतिरीक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, सीएफआयचे महासचिव मनिंदर पाल सिंह (दूरदृष्य प्रणालीद्वारे) आदी उपस्थित होते.आगामी स्पर्धेसाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी संस्था आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची नियामक परिषद (गव्हर्निंग कौन्सिल) स्थापन करण्यात यावी. गव्हर्निंग कौन्सिलने दरमहा बैठक घेऊन तयारीचा प्रगतीचा आढावा घ्यावा. ही परिषद पुणे टूरची सर्वोच्च धोरणात्मक आणि देखरेख करणारी संस्था असावी. त्यासोबतच आयोजन समितीही स्थापन करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या. त्यात प्रत्येक समिती, प्रत्येक विभाग आणि प्रत्येक अधिकाऱ्याच्या भूमिका, जबाबदाऱ्या, अधिकार आणि स्पष्टपणे निश्चित करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. परंतु, यावर्षीच्या स्पर्धेचे क्षेत्र मोठे असून स्पर्धेच्या निधीसाठी सर्व महानगरपालिका तसेच अन्य यंत्रणांना सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, असेही मत त्यांनी मांडले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले. गतवेळी अत्यंत कमी कालावधीच्या तयारीत ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. येथील गड-किल्ले, ऐतिहासिक वारसा, पर्यटनस्थळे या स्पर्धेमुळे जागतिक नकाशावर पोहोचली. अत्यंत यशस्वीरित्या व सुरक्षित स्पर्धा आयोजित केल्यामुळे ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’ (युसीआय) या जागतिक संघटनेने आगामी स्पर्धेचा दर्जा युसीआय २.२ वरून २.१ असा उन्नत केला आहे. गतवर्षीच्या 4 च्या तुलनेत यावर्षी स्पर्धेचे 6 टप्पे असणार असून 1 हजार 99 कि.मी.ची ही स्पर्धा असणार आहे, असे त्यांनी सांगितले. बैठकीत, गतवर्षी अतिशय चांगले आयोजन केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात अंमलबजावणी यंत्रणांचा सत्कार करण्यात आला.विभागीय आयुक्त श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, या स्पर्धेसाठी स्वच्छता ही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ती हाती घेतली पाहिजे. स्पर्धा जाणाऱ्या गावातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बाबत प्रायोगिक तत्त्वावर राबविले पाहिजेत. त्यासाठी कचऱ्याचे घनीकरण (कॉम्पॅक्टिंग) करण्याचे प्रकल्प राबवून तो कचरा जवळच्या शहरांच्या कचरा डेपोंना पाठवता येऊ शकतात. स्पर्धेसाठी इको टुरिझम अंतर्गत बांबूच्या वस्तू तयार करून वापर करता येईल, असेही त्या म्हणाल्या.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार म्हणाले, गतवेळच्या स्पर्धेसाठी पोलीस दलाला मोठ्या प्रमाणात साहित्य, वाहने वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. यावर्षीच्या स्पर्धेत अजून लोकांचा सहभाग वाढेल असे प्रयत्न आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्याचा दिवस सुटीचा असल्याने वाहतूक नियमन करणे सोपे होणार आहे, असेही ते म्हणाले. मनपा आयुक्त श्री. राम, डॉ. सूर्यवंशी आदींनी माहिती दिली.

Latest News