PCMC: महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा-  नगरसेविका शितल वर्णेकर

varne

पिंपरी- चिंचवड | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- चिखली येथील म्हेत्रेवस्तीमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या शितलताई धनंजय वर्णेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विशेष मोकाट कुत्रे नियंत्रण मोहीम राबविण्यासह स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा प्रभाग क्रमांक १२ हा मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य आणि कामगार वर्गाची वस्ती असलेला परिसर आहे. पहाटेपासून नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, विविध भागांत मोकाट कुत्र्यांचे कळप वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुत्र्यांचे कळप नागरिकांच्या मागे लागणे, अचानक धावून येणे, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, अशा घटना वारंवार घडत असल्याचा दावा वर्णेकर यांनी केला आहे. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी फेरफटका मारणेही धोकादायक वाटत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.चिखलीतील घटनेत स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचा जीव वाचला असला, तरी ती गंभीर जखमी झाली आहे.

ही घटना प्रभाग क्रमांक १२ मध्ये घडलेली नसली, तरी भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना आपल्या प्रभागात घडू नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे वर्णेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोकाट कुत्र्यांबाबत नागरिकांकडून संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या जातात. मात्र, तक्रारी केल्यानंतरही अपेक्षित स्वरूपाची ठोस कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची भावना आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना फोन न उचलणे अथवा तक्रारींना वेळेत प्रतिसाद न मिळणे, हीदेखील गंभीर बाब असल्याचे वर्णेकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. “नागरिकांच्या जीविताशी संबंधित विषयात प्रशासनाची निष्क्रियता अजिबात स्वीकारता येणार नाही. घटना घडल्यानंतर औपचारिक कारवाई करण्यापेक्षा घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांबाबत नागरिकांना तातडीने तक्रार करता यावी, यासाठी प्रभाग क्रमांक १२ साठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी, अशी ठोस मागणी वर्णेकर यांनी केली आहे. या हेल्पलाइनवर नोंदविलेल्या प्रत्येक तक्रारीला स्वतंत्र क्रमांक देण्यात यावा आणि ठराविक कालमर्यादेत संबंधित पथकाने घटनास्थळी पोहोचून कार्यवाही करणे बंधनकारक करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. तक्रारींची संख्या, त्यावर झालेली कार्यवाही आणि प्रलंबित तक्रारी याचा नियमित आढावा घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती करावी. तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक १२ मधील सर्व सोसायट्या, शाळा, अंगणवाड्या, कामगार वसाहती, मॉर्निंग वॉकचे मार्ग आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धोकादायक आणि आक्रमक कुत्र्यांबाबत नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी. तसेच निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवून मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणावी, असेही पत्रात नमूद आहे.

Latest News