CNG: सीएनजीसाठी 97.75 पैसे मोजावे लागणार…

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील वाहनधारकांना या दरवाढीचा फटका बसणार आह CNG सीएनजी’साठी आवश्यक नैसर्गिक वायूच्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे दरवाढ करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.वाहनांसाठी स्वस्त इंधनाचा पर्याय असलेल्या ‘सीएनजी’च्या किमतीत पुन्हा वाढ झाल असून, सीएनजी आता प्रतिकिलो दोन रुपयांनी महागणार आहे. सोमवारी (३१ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून एक किलो सीएनजीसाठी ९७ रुपये ७५ पैसे मोजावे लागणार आहेत. ‘या आव्हानात्मक काळातही, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे भारतात सीएनजीच्या वापरात लक्षणीय वाढ होत आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सीएनजीसाठी लागणाऱ्या गॅसचा मोठा हिस्सा आयात केलेल्या स्पॉट एलएनजीमधून घेतला जात आहे. जागतिक किमती वाढणे आणि स्पॉट कार्गोवर अधिक अवलंबून राहावे लागणे. त्यामुळे सीएनजी क्षेत्रासाठी इनपुट गॅसच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे,’ असेही ‘एमएनजीएल’ने स्पष्ट केले.
दरवाढीची कारणेही ‘एमएनजीएल’कडून कळविण्यात आली आहेत. जुलै २०२६ पासून पश्चिम आशियातील संकट पुन्हा वाढल्याने, जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या एलएनजी वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी, संकटापूर्वीच्या काळाच्या तुलनेत जागतिक एलएनजीच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. याचबरोबर युरोपमध्ये हिवाळ्यापूर्वी नैसर्गिक वायूचा साठा करण्याची घाई सुरू झाल्याने जागतिक एलएनजी बाजारात आणखी तुटवडा निर्माण झाला आहे,’ असे ‘एमएनजीएल’कडून सांगण्यात आले आहे.
‘वाहनांसाठी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी हा इंधनाचा स्वस्त पर्याय आहे. ‘सीएनजी’मुळे प्रवासी चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे २३ टक्के बचत करता येते. रिक्षाचालकांना सुमारे २५ टक्के बचत करता येते,’ असे ‘एमएनजीएल’ने म्हटले आहे. दरम्यान, केवळ वाहनधारकांसाठी ‘सीएनजी’च्या दरात वाढ करण्यात आली असून, घरगुती ‘पीएनजी’च्या किमतीत वाढ करण्यात आली नसल्याचे ‘एमएनजीएल’कडून स्पष्ट करण्यात आले.
