आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेत स्त्रीशक्ती, नेतृत्व अन् मानसिक स्वास्थ्यावर मंथन

- एक हजार उपासक-उपासिकांची उपस्थिती; विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा पुरस्काराने गौरव
पिंपरी, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दि. 18 – बौद्ध धम्मातील प्रज्ञा, करुणा, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या मूल्यांना अधोरेखित करत महिला नेतृत्व, ऐतिहासिक योगदान, जागतिक भिक्खुनी परंपरा आणि मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांवर चिंचवड येथे शनिवारी (दि. १७) आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेत विचारमंथन करण्यात आले. डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे, लक्ष्मीकांता माने यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.
विस्डम इन मोशन, कॅटलिस्ट फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही परिषद पार पडली. या परिषदेत ज्ञानातून नेतृत्व, संवादातून समाजनिर्मिती करण्याच्या तसेच बौद्ध मूल्ये समाजात रुजवण्याविषयी चर्चा करण्यात आली. परिषदेला सुमारे एक हजार उपासक-उपासिकांनी उपस्थिती लावली.
देश-विदेशांतील बौद्ध भिक्खुनी, अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या आणि विविध क्षेत्रांतील महिलांनी परिषदेत सहभाग घेतला. बुद्ध अँथमवरील नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर व्हिएतनामी बौद्ध परंपरेतील मंत्रोच्चार सादर करण्यात आले.
परिषदेच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विमल थोरात यांनी बुद्धांचा आणि आंबेडकरी विचार पुढे चालू ठेवण्यासाठी यापुढे जेन झी पिढीने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या शिक्षित बना या आवाहनाला महिलांनी गांभीर्याने घेतले असून नवी ‘शिक्षित पिढी’ घडवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले.
विशेष अतिथी, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॅा. वैशाली प्रधान यांनी, बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची तसेच स्वतंत्र पाली विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची मागणी केली. त्याचबरोबर पुढची परिषद, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात घेण्याचे निमंत्रण दिले.
प्रा. मनोरी पी. सेनानायके यांनी ‘बौद्ध मूल्ये : सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय या मूल्यांवर आधारित असणारा बुद्धिजम एक आदर्श जीवनमार्ग असल्याने ही मूल्ये समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. यावेळी भिक्खुनी महाकासा यांनी कोरियन भिक्खुनी संघाची जागतिक स्तरावरील प्रेरणादायी भूमिका या विषयावर व्हिडिओद्वारे विचार मांडले. डॉ. रुपाली भामरे मून यांनी परदेशातील आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि भारतीय समुदायाची भूमिका या विषयावर भाष्य केले. भिक्खुनी विसुद्धिपन्ना यांनी युद्धातून शांततेकडे वाटचाल करताना व्हिएतनामी बौद्ध भिक्खुनींच्या योगदानाची माहिती दिली. डॉ. योजना भगत यांनी शिलालेखांच्या आधारे बौद्ध महिलांच्या ऐतिहासिक प्रवासाचा वेध घेतला.
मानसिक स्वास्थ्यावरील सत्रात डॉ. नीलम ओसवाल यांनी धम्माच्या तत्त्वज्ञानातून ताण, चिंता आणि मानसिक अस्वस्थतेवर मात करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. विविध चर्चासत्रांत बौद्ध परंपरेतील महिलांचे स्थान, त्यांचे ऐतिहासिक योगदान आणि समकालीन नेतृत्व यांवर चर्चा झाली.
अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी आंबेडकरवादी बनण्याचा आपला प्रवास कथन केला. माझ्यासाठी आंबेडकर हा नुसता विचार नाही तर ती माझी जीवनप्रणाली आहे असे सांगत त्यांनी बाबासाहेबांच्या आईच्या केलेल्या भूमिकेमुळे जीवनात झालेला बदल कथन केला.
भिक्खुणी उप्पलवना थेरी (श्रीलंका), द्रुपॅान ग्यालतेन सामतेन (तिबेटी भिक्खुणी), भंते सुनीती भिक्खुणी, भिक्खुणी शाक्य धम्मदिना यांनी महिला भिक्खु संघाचा प्रवास व आपले अनुभव कथन केले.
जेन झींच्या काळात जयभीम २.० या चर्चासत्रात छाया कविरे (बीबीसी पत्रकार दिल्ली), मीनाक्षी इंगळे (लेखिका, कवयित्री) आणि डॅा. सांची कांबळे यांनी तरुणाईचा जयभीम या नाऱ्याशी नव्याने जुळलेला संबंध उलगडून दाखवला.
मार्गदर्शित ध्यानाच्या सत्राने परिषदेची सांगता झाली.
भिक्खुनी संघासोबतच समाजाकल्याण विभाग पुणेच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचूरे, पिंपरी चिंचवड महापालिका उपआयुक्त अण्णा बोदडे, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, डॉ. सुहास कांबळे, कतलाबोडीच्या सरपंच अर्चना खोब्रागडे,आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार
या परिषदेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अॅड. रंजना भोसले, वैशाली शेलार आणि डॉ. मनीषा कर्णे यांचा ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर मीराताई आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
