मोशीमध्ये उद्योजकतेचा महाकुंभ! ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’चे १५ ऑक्टोबरपासून आयोजन

- १ हजारांहून अधिक स्टॉल्स, ५० पेक्षा जास्त व्यावसायिक क्षेत्रांचा सहभाग; शासन आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दि. १२ – मराठी उद्योजकांना व्यवसायवृद्धीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उद्योगविश्वाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) येथे हा भव्य व्यावसायिक महोत्सव होणार आहे. या प्रदर्शनाची माहिती आज पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मराठा उद्योजक कक्षाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय वायाळ यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर, सचिव रमेश पवार, विशेष उपस्थितीत मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, कार्यकारिणी सदस्य गणेश जाधव, डॉ. जयसिंग कदम, विकास नाणेकर, गणेश औताडे, पल्लवी बोरडे आणि सोनाली भोसले तसेच यांच्यासह पदाधिकारी, सदस्य या वेळी उपस्थित होते.
मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था, पुणे यांच्या आयोजनातून होणाऱ्या या एक्स्पोमध्ये विविध उद्योग क्षेत्रांतील उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनात एक हजारांहून अधिक स्टॉल्स आणि ५० पेक्षा जास्त व्यावसायिक क्षेत्रांचा सहभाग असणार आहे.
या एक्स्पोला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार, केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांची विशेष मान्यवर म्हणून उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना आपली उत्पादने व सेवा सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच व्यावसायिक संपर्क वाढविणे, नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचणे, गुंतवणुकीच्या संधी शोधणे आणि विविध उद्योग क्षेत्रांमध्ये व्यावसायिक भागीदारी निर्माण करणे, यावर भर दिला जाणार आहे. मराठी उद्योजकांना स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय विस्ताराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. नवउद्योजकांसह प्रस्थापित व्यावसायिकांनाही या प्रदर्शनातून नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान,१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मोशी येथील PIECC येथे होणाऱ्या या प्रदर्शनात उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
……………………….
