पुणे-मुंबई प्रवासात युवकाला ३४ हजार रुपयाला लुटले.

पुण्याहून मुंबईला येताना अनोळखी व्यक्तीच्या गाडीमध्ये लिफ्ट घेणे एका २६ वर्षीय तरुणाला चांगलेच महाग पडले आहे. या तरुणाला गाडीमध्ये बसलेल्या अन्य चौघांनी तब्बल ३४ हजार रुपयांना लुटले. गुरुवारी हा प्रकार घडला. रोहित महेश कारेकर हा तरुण वाकड पूलावर मुंबईला जाणारी बस पकडण्यासाठी थांबला होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एक हुंडाय कार त्याच्याजवळ येऊन थांबली. कार चालकाने आपण मुंबईच्या दिशेने चाललो असून तुलाही तिथे सोडतो असे सांगितले. कारमध्ये आधीपासूनच चारजण बसले होते. रोहितला त्यांच्यावर कुठलाही संशय आला नाही. रोहित कारमध्ये बसला. उर्से टोल नाका ओलांडल्यानंतर आरोपींनी आपले खरे रंग दाखवले.त्यांनी त्यांच्याजवळच्या धारदार शस्त्राच्या धाकावर रोहितला चांदीचे ब्रेसलेट, चैन काढायला लावली. त्याचा मोबाइल फोन आणि डेबिट कार्ड काढून घेतले व कार्डाचा पिन नंबरही त्याच्याकडून वदवून घेतला. आरोपींनी नंतर गाडी पुण्याच्या दिशेने वळवली व रोहितला ९.३० च्या सुमारास ताथवडे कॉलेजजवळ सोडून दिले. आरोपींनी रोहितच्या डेबिट कार्डचा वापर करुन त्याच्या खात्यातून २६ हजार रुपये काढले अशी माहिती हिंजेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारीयांनी दिली. रोहित कारेकर मुंबई जोगेश्वरी येथे रहायला असून तो एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करतो. पुण्यात एका मित्राच्या वाढदिवसासाठी म्हणून तो आला होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर मुंबईला परतण्यासाठी म्हणून वाकड पूलावर तो बसची वाट पाहत उभा असताना ही घटना घडली.

Latest News