पुण्यातील विश्रांतवाडी येथे तरुणाचा खून

पुणे: ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहताना बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून २४ वर्षीय तरुणाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथे रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अक्षय गागोदेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. इंद्रजीत गायकवाड याच्या बहिणीसोबत तो धानोरी येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होता. अक्षय आपल्या बहिणीला त्रास देत असल्याची तक्रार इंद्रजीतच्या कानावर आली होती. तो राग मनातून धरून इंद्रजीतनं काही साथीदारांसह रविवारी रात्री अक्षयवर हल्ला चढवला. त्याला दगडांनी मारहाण केली. या हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला. अक्षयला वाचवण्यासाठी आलेला त्याचा मित्रही हल्ल्यात जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट आठने तात्काळ शोधमोहीम सुरू केली आणि काही तासांतच सर्व आरोपींना खडकी येथील होळकर पुलाजवळच्या ख्रिश्चन स्मशानभूमी परिसरातून अटक केली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या मदतीनं पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, हवालदार मचे, खुनवे, शेलार यांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इंद्रजीत गुलाब गायकवाड (वय २३, रा. गोकुळ नगर, धानोरी), निलेश विश्वनाथ शिगवन (वय २४, धानोरी), विजय कालुराम फंड (वय २५ रा. खडकी), सागर राजू गायकवाड ( वय १७, रा. खडकी) आणि कुणाल बाळू चव्हाण (वय २२, रा. बोपखेल, विश्रांतवाडी) यांचा समावेश आहे. चौकशीसाठी या सर्वांना विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Latest News