पॅरोलवर सुटका झाल्यावर मिरवणूक काढणाऱ्या ”शरीफ बबन मुलाणी” पोलिसाला निलंबित

प्रतिनिधी : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या भावांची येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका झाल्यावर मिरवणूक काढणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. हा पोलिस प्रवास करीत असलेल्या वाहनात बेकायदा पिस्तुल सापडले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. शरीफ बबन मुलाणी (वय ३६, रा. भोसरी) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. मुलाणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी/ दरोडा विरोधी पथकात सध्या कार्यरत होता. शुक्रवारी त्याची ड्युटी भोसरीमध्ये होती. मात्र, कामाच्या ठिकाणी हजर न राहता खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचे स्वागत करण्यासाठी तो येरवडा कारागृह येथे गेला. आरोपीची सुटका झाल्यावर त्याची दुचाकी आणि चारचाकी वाहनातून रॅली काढण्यात आली होती. ही रॅली पोलिसांनी अडवली. या वेळी पोलिसांना मुलाणी बसलेल्या कारमध्ये एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे आढळली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलाणीला निलंबित करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत. या प्रकरणी आझाद शेखलाल मुलाणी (वय ३०, रा. चिखली), आदेश दिलीप ओकांडे (वय २१, रा. निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय ३८, रा. चिखली) संदीप किसन गरूड (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) हुसेन जाफर मुलाणी (वय ४३) सिराज राजू मुलाणी (वय २२), विनोद नारायण माने (वय २६, तिघेही रा. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सोमनाथ खळसोडे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींना पाच जूनपर्यंत कोठडी येरवडा : येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका झालेल्या गुन्हेगाराचा त्याच रात्री पाठलाग करून कोयत्याने निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून, चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. कोर्टाने आरोपींना ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवारी यातील आणखी दोघांना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या अकरा झाली आहे. नितीन शिवाजी कसबे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याचा बुधवारी रात्री खून झाला होता. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.