जगाच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत– पंतप्रधान


नवी दिल्ली – सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीत जगाच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत असल्याचे म्हणत, ‘जगाचा भारतावरील विश्वास वाढलाय, भारताकडून जग आता नवीन आशा बाळगतोय’, असे सांगितले. त्याचबरोबर ‘मेड इन इंडियाचं मेड फॉर वर्ल्ड झालं’ पाहिजे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘कोरोनामुळे आपला वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाऊनला मागे सोडून अनलॉक फेज १ मध्ये प्रवेश केला आहे. अनलॉकमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल’, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच ‘भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल’, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.