युवा उद्योजक सुशील बंग यांच्या वतीने पोलिसांसाठी ”250 PPE KITS” भेट देण्यात आले

पुणे  – करोनाविरुद्धची लढाई लढताना अनेक संकटे आली, अडथळे आले तरीही धीर खचू न देता पोलिसांनी कार्य सुरूच ठेवले, हे प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांनी केले.

युवा उद्योजक सुशील बंग यांच्या वतीने पोलिसांसाठी अडीचशे पीपीई कीट्‌स, मास्कस्‌, ग्लोव्हज आदी वैद्यकीय साहित्य जोशी यांच्या हस्ते भेट देण्यात आले. करोना बाधितांची ने-आण करताना पोलिसांनी पीपीई किट्‌सची गरज भासते. अशावेळी ही किट्‌स त्यांच्यासाठी सुरक्षाकवच म्हणून उपयुक्त ठरणारी आहेत. यातील काही किट्‌स महिला पोलिसांसाठीही उपयुक्त आहेत. करोनाविरूद्धच्या लढाईत मार्च महिन्यापासून पुण्यातील पोलीस अतिशय धैर्याने आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिलेला आहे. यात काही पोलीस आजारी पडले, तरी त्यांनी आपला धीर खचू दिला नाही. हे कार्य प्रशंसनीय असल्याचे जोशी म्हणाले. फरासखाना पोलीस स्टेशन इथे झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त सपना गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर आदी उपस्थित होते.