नागपूर खंडपीठाने केंद्र सरकार आणि पीएम केअर फंडाच्या विश्वस्तांना नोटीस…

मुंबई: कोरोनामुळे ओढावलेली आर्थिक परिस्थिती आणि या जीवघेण्या आजाराशी मुकाबला करण्यासाठी रक्कम उभारण्यासाठी केंद्र सरकारने PM care Fund सुरू केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निधीत मदत करावी असे आवाहनही केले होते. परंतु या निधीत किती पैसे जमा झाले ही माहिती देण्यास सरकारने नकार दिला होता. या संदर्भात नागपूर खंडपीठासमोर एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकार आणि पीएम केअर फंडाच्या विश्वस्तांना नोटीस धाडली आहे. या सगळ्यांना या निधीमध्ये किती रक्कम जमा झाली आहे त्याचा तपशील न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. नागपूरचे वकील अरविंद वाघमारे यांनी नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली होती. याचिकेत वाघमारे यांनी म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे PM Care फंडचे विश्वस्त आहेत. हा निधी कोरोना संकटातून वाचण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या विश्वस्थचे गृहमंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री सदस्य आहेत. या निधीतून जनतेला मदत केली जाईल असे म्हटले होते. या विश्वस्तांमध्ये अजून तीन सदस्यांची नियुक्ती केले जाणे अपेक्षित होते जे अजून झालेले नाही. वकील वाघमारे यांनी याचिकेत मागणी केली आहे आहे की जेवढे पैसे या निधी जमा झाले आहेत त्याची माहिती वेबसाईटवर जारी केली जावी. तसेच या निधीतून किती पैसे खर्च झाले याचा हिशोब दिला जावा. कॅगकडून या निधीचे परीक्षण केले जावे आणि विश्वस्तांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही नियुक्त केली जावी. या याचिकेसाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. त्यांनी या निधीचा कुठलाही हिशोब देण्यास विरोध दर्शवला. तसेच ही याचिका फेटाळून लावावी अशी मागाणी केली. सर्वोच्च न्यायालयातही अशीच याचिका आली होती ती फेटाळण्यात आली होती असेही त्यांनी नमूद केले. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारची बाजू फेटाळून लावली आहे. दोन आठवड्यांच्या आत सरकारने आपली बाजू मांडावी असे कोर्टाने म्हटले आहे. PM Care Fund मध्ये किती निधी जमा झाला यासाठी माहिती अधिकारात माहिती मागवण्यात आली होती. परंतु हा निधी माहिती अधिकाराच्या कायद्यात बसत नाही असे सांगून केंद्र सरकारने याबाबत माहिती देण्यास नकार दिला होता.

Latest News