पुणे-पिंपरी चिंचवडला जाण्यावर बंदी – -अधिकारी सचिन बारवरकर

पुणे : पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी, बुद्रुक, कदमवाकवस्ती, नऱ्हे आणि वाघोली या चार गावांधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, मजूर, कामगार आणि नागरिकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 6 जून ते 12 जूनपर्यंत असणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवरकर यांनी हे आदेश दिले. हवेली तालुक्‍यातील ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या चार गावांमध्ये राहणारे ग्रामस्थ, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, नर्स, डॉक्‍टर्स, औषधी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामासाठी सद्यस्थितीत गावाबाहेर ये-जा करतात. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारत येत नाही. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी अथवा कामगार वर्ग यांना सात दिवस त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा शक्‍य नसल्यास स्वत:च्या घरी सात दिवस रहावे. कामाच्या ठिकाणीच राहून काम करावे किंवा स्वतंच्या घरी विलगीकरण करून काम करावे, असे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

WhatsApp chat