पुण्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला


पुणे – जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करत असतानाच महाराष्ट्राने काल वादळी संकटाला तोंड दिलं. काल दिवसभर ‘निसर्ग’ चक्रीवादळासह मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलं. या वादळी वाऱ्यांमुळे पुणे शहरात ठिकठिकाणी साठहून अधिक, तर पिंपरीत ५४ झाडे उन्मळून पडली. तसेच वादळात पुणे जिल्ह्यात दोन जणांचा बळी गेला असून रात्रभर पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत होता. दरम्यान, आणखी दोन दिवस शहर आणि परिसरात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यातील मोकरवाडी येथे प्रकाश किसन मोकर (वय ५२) यांच्या घराचा एक पत्रा वादळात उडाला. त्यामुळे उर्वरीत पत्रे धरून ठेवण्यासाठी ते गेले असताना सोसाट्याच्या वाऱ्यात ते पत्र्यासह दूर उडाले. यात त्यांचा मृत्यू झाला. तर खेडमधील वहागाव येथे मंजाबाई अनंत नवले (वय ६५) यांचा भिंत कोसळून मृत्यू झाला. तसेच वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. दरम्यान, रत्नागिरी आणि रायगडमध्येही निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असून याठिकाणी अनेक विजेचे खांब, झाडं, घरं कोसळली आहेत. तर अलिबागमध्ये विजेचा खांब कोसळून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.