अर्थमंत्री यांनी जूनमध्ये नव्याने पुरवणी बजेट मांडा : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – करोना व्हायरस आणि निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जूनमध्ये नव्याने पुरवणी अर्थसंकल्प सादर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकटामुळे १ फेब्रुवारीला सादर केलेला अर्थसंकल्प अप्रासंगिक ठरला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर केला पाहिजे. नवीन महसूल प्रवाह, कर आकारणी, कर्ज योजना, प्राधान्यानुसार सुधारित खर्च, विकास आराखड्यात कपात करुन सादर होणाऱ्या बजेटला लोकसभेने मंजूर करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. दरम्यान, याआधीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यांनी खर्चाचा सुधारित अंदाज सादर केला पाहिजे, असे सांगितले होते. तसेच प्रत्येक राज्यांसमोर विविध संकटे उभी राहिली आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आर्थिक नियोजनाची आश्‍यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले होते. तसेच केंद्र सरकारला याआधीदेखील अर्थचक्र सुरळीत चालावं यासाठी नोटा छापण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.

WhatsApp chat