गुजरात काँग्रेसमध्ये भूकंप: 8 आमदारांनी राजीनामे दिले

गांधीनगर : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात काँग्रेसमध्ये भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 8 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आधीच ढासळलेल्या काँग्रेसच्या इथल्या बुरुजाला आणखी खिंडार पडलं आहे. या फुटीचा फायदा थेट भाजपला मिळणार आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला नुकसान होणार असून भाजपच्या धक्क्याने आणखी काही विधायक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली जात आहे. गुजरातमध्ये भाजपकडे 103 आमदार आहे. राष्ट्रवादी आणि बीटीपी या पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर आणखी एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे भाजपला सध्या 106 आमदारांचं समर्थन मिळालं आहे. काँग्रेसकडे एकूण 73 आमदार होते. तर जिग्नेश मेवानी या अपक्ष आमदाराचा पाठिंबा होता. मात्र 8 आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसकडे फक्त 65 आमदार राहिले असून मेवानींचा पाठिंबा धरला तर 66 आमदार होतात. गुजरातमध्ये राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी 38 मतांची गरज आहे. त्यामुळे दोन जागा भाजपला मिळणार हे नक्की आहे. तर दोन जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला 76 मतांची गरज असून तेव्हढी मतं त्यांना मिळणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय. काँग्रेसच्या पदरात फक्त एक जागा पडणार आहे. तर भाजपने काँग्रेसचे माजी नेते नरहरी अमीन यांना तिसरा उमेदवार म्हणून उभं केलंय. काँग्रेसमधले काही आमदार पाठिंबा देतील अशी भाजपची खात्री आहे. त्यामुळे भाजपचा तिसराही उमेदवार निवडून येवू शकतो असं मानलं जातं. स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि केंद्रीय नेत्यांची सुटत चाललेली पकड यामुळे काँग्रेसला धक्के बसत असल्याचं बोललं जात आहे.

Latest News